नवी दिल्ली : देशात कोरोनाचा फैलाव सर्वच क्षेत्रात होत असताना सर्वोच्च न्यायालयातील १३ न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
देशपातळीवर कोरोनाने थैमान घातले असून जनतेशी संपर्क येणाऱ्या सगळ्याच क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णात अधिक वाढ होताना दिसत आहे. राज्यात पोलीस दलाला कोरोनाने मोठे नुकसान पोहोचवले असून दुसर्या लाटेत अनेक पोलिसांना आपला प्राण गमवावा लागला आहे तर तिसऱ्या लाटेत राज्यभर पोलीस दलात कोरोनाने घुसखोरी केली आहे. पोलिसांचा जनतेशी नित्याचा संबंध असतो आणि त्यांना रस्त्यावर काम करावे लागते त्यामुळे पोलीस अधिक संख्येने कोरोनाबाधित होताना दिसत आहेत. पोलिसांसह अटकेत असलेले आरोपी आणि न्यायालयीन कोठडीतील कैदी यानाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची बाधा होत असल्याचे रोज समोर येत आहे. पोलिसांच्या पाठोपाठ न्यायालयीन वर्तुळातही कोरोनाचे चिंता निर्माण केली आहे.
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. या जीवघेण्या साथीने सर्वसामान्यांनाच नव्हे तर राजकारणी आणि अभिनेत्यांनाही वेठीस धरले. महामारीच्या तिसऱ्या लाटेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे तेरा न्यायाधीश आणि ४०० न्यायालयीन कर्मचारी कोरोना संक्रमित झाले होते. विशेष म्हणजे, आपला खटला रजिस्ट्रीद्वारे सुनावणीसाठी ताबडतोब सूचीबद्ध करण्यात आला नसल्याची तक्रार वकिलाने केल्यानंतर भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी ही माहिती दिली आहे.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ३४ न्यायाधीशांची मंजूर संख्या आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह ३२ न्यायाधीश कार्यरत आहेत. यात सुमारे तीन हजार न्यायालयीन कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे कोविड-19 प्रकरणांची वाढती संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयात ३ जानेवारीपासून आभासी पद्धतीने सुनावणी सुरू आहे. पोलीस, न्यायालय आणि संसद इथपर्यंत कोरोनाने शिरकाव केला असून कोरोनाच्या घुसखोरीची चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा