जागर न्यूज : राज्यात सगळीकडेच पावसाने पुनरागमन केले असले तरी, पंढरपूर तालुक्यासह सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा असून उजनी धरणाची अवस्था अजूनही चिंताजनक आहे.
पावसाने यावर्षी मोठी फसवणूक केली असून, हवामान विभागाच्या अंदाजामुळे शेतकरी आशादायी रहिले पण प्रत्यक्षात पाऊस आलाच नाही, आता गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात सगळीकडेच पावसाने मनावर घेतले असल्याचे दिसत आहे पण, आता पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी परतीचा पाऊस दिलासा देत असतो पण त्या आधी थोडाफार तर पाऊस झालेला असतो, यावर्षी तशी परिस्थिती नसून, सोलापूरसह तीन जिल्ह्यांना वरदान असलेले उजनी धरण देखील यावर्षी अजूनही तहानलेले आहे, पावसाळा संपत आल्याने, यावर्षी धरण भरेल की नाही याबाबत शंका व्यक्त होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पावसाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळापैकी ८१ मंडळात पावसाने हजेरीही लावलेली नाही. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती चिंताजनक दिसू लागली आहे.
जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांपैकी ८१ मंडळांमध्ये १ जून ते ३१ ऑगस्ट या तीन महिन्यात तब्बल ६० ते ८० दिवस पाऊस पडलेला नाही. पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या चार तालुक्यांमध्ये चिंताजनक स्थिती आहे. अक्षरश: बळीराजाच्या डोळ्यादेखत पाण्याअभावी पिके माना टाकत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाच दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे.सोलापूर शहर व जिल्ह्याची भिस्त उजनीवर अवलंबून आहे. पण, पावसाअभावी उजनी धरण सध्या १६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात एकरुख, हिंगणी, मांगी, आष्टी, जवळगाव, बोरी, पिंपळगाव ढाळे या मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी नाही. पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीपात पेरलेली मका, भुईमूग, तीळ, कारळे, सोयाबीन, उडीद, मूग, तूर, मका, बाजरी, सुर्यफूल या पिकांना फुले सुद्धा आली नाहीत.
जिल्ह्यातील बहुतेक महसूल मंडळांमध्ये १ जूनपासून एकही मोठा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणीचा खर्च देखील निघणार नाही, अशी चिंताजनक स्थिती आहे. (Solapur district on the brink of drought) दोन-तीन दिवसांत पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसह शासनाला पाठविला जाईल. पण, सद्य:स्थितीत ७५ ते ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याचे चित्र आहे. सद्या पाऊस पुन्हा परतला असल्याचे चित्र दिसत असले तरी, भविष्यातील संकट दूर करण्यास तो कितपत उपयोगी ठरेल याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा