जागर न्यूज : पंढरपूर येथे वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे अखेर निलंबन झाल्याने नागरिकांनी पेढे वाटले असून, पंढरपूर येथून बदली झाली तेंव्हा देखील पेढे वाटण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तत्कालीन तहसिलदार वैशाली वाघमारे यांना राज्य सरकाराने नुकतेच निलंबित केले आहे. अनेक प्रकरणात अनियमितता आढळल्याने वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वाघमारे यांच्या विराेधात माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी वाघमारे यांच्या विराेधात मुंबईत आंदोलन छेडले हाेते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. दरम्यान त्यांच्यावर झालेल्या कारवाईची माहिती कळताच एका शेतकरी कुटुंबाने तहसीलदार कार्यालयाच्या आवारात पेढे वाटून आनंद व्यक्त केला. तसेच वाघमारे यांच्या विराेधात घाेषणा दिल्या.
दरम्यान खेडच्या तहसीलदारांनी खेड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने वाघमारे यांच्यावर पाच दोषारोप ठेवले आहेत. त्यांनी १७ कोटी ५६ लाख रुपयांचे शासकीय महसुलाचे नुकसान केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पंढरपूर येथे देखील वैशाली वाघमारे यांची कारकीर्द वादाची ठरली होती आणि नागरीकातून कमालीचा संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर त्यांची पंढरपूर येथून बदली झाली होती आणि आता तर त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एखाद्या चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्या - त्या भागातील अनेक लोक रस्त्यावर उतरून बदली रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करतात. पंढरपुरात मात्र एका महिला तहसीदाराच्या बदलीनंतर वेगळाच प्रकार पंढरपूर येथे अनुभवायला मिळाला होता. (Controversial tehsildar Vaishali Waghmare suspended) बदली झाल्याची माहिती कळताच बळिराजा शेतकरी संघटनेसह शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिर परिसरात जाऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता. एका वर्षाच्या आतच तहसीलदार वैशाली वाघमारे यांची पंढरपूर येथून बदली झाली होती.
तहसीलदार वैशाली वाघमारे पंढरपुरात रुजू झाल्यापासून त्यांच्याविषयी नाराजी होती. लोकांशी संपर्क न ठेवणे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय पदाधिकारी यांचे फोन न घेणे यासह विविध कारणांमुळे त्यांच्याविषयी नाराजी होती. त्यांच्या कामाविषयी वरिष्ठांकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनीही त्यांच्या बदलीची मागणी केली होती. आता मात्र त्यांचे निलंबन झाले असून नागरिकांनी पेढे वाटून त्याचे स्वागत केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा