जागर न्यूज : गुन्हेगारीने आता वयाच्याही मर्यादा ओलांडल्या असून, पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
गुन्हेगारीच्या बाबतीत अलीकडे महाराष्ट्र आघाडीवर जाताना दिसू लागला असून राज्याच्या गृह खात्याकडे सतत बोट दाखवले जात आहे. पुण्यासारख्या सुसंकृत मानल्या जाणाऱ्या शहराला देखील गुन्हेगारीचा विळखा पडलेला असून आता तर अत्यंत धक्का देणारी घटना पुण्यात घडली आहे. किरकोळ वादातून पाच अल्पवयीन मुलांनी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हडपसरमधील रामटेकडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे.महादेव रघुनाथ मोरे (वय २६, रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलिसांनी याप्रकरणामध्ये ५ अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव आणि अल्पवयीन ५ मुले एकमेकांना आधीपासून ओळखत होते. यातील एक मुलगा शाळेत शिक्षण घेत आहे. तर इतर मुले रोजदारीने काम करुन आपलं पोट भरतात. तर हत्या झालेला महादेव हा एक खासगी कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी ही सर्व मुलं आणि महादेव भेटले. त्यावेळी किरकोळ कारणावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. मुलांनी या गोष्टीचा राग आला. त्यांनी आपल्या मनात राग धरत पुन्हा महादेवची भेट घेतली. (Youth killed by five minors) यावेळी हे सर्वजण रामटेकडी परिसरातील ढेरे कंपनीजवळ डोंगरावर मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी गेले. तिथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामरीत होऊन मुलांनी त्याला मारहाण करत दगडाने ठेचले आणि हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा