जागर न्यूज >: तहसीलदार यांच्या नावाने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तीस मोहोळ तालुक्यात अटक करण्यात आली असून २५ हजार रुपये लाचेचे हे प्रकरण जून महिन्यातील आहे.
मोहोळ येथील तत्कालीन तहसीलदाराच्या नावाने २५ हजारांची लाच मागणाऱ्या खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल उशिरा अटक केली आहे. दाजीसाहेब श्रीमंत काकडे (वय ४३, रा. काकडे वस्ती, पंढरपूर रोड, मोहोळ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.अब्दुल माजिद महबूब पटेल (वय ३२, रा. शेळगी, सोलापूर) व मोहम्मद सादिक मोहम्मद जावेद कलबुर्गी हे दोघे भागीदारीत धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी खरेदी केलेल्या धान्याची वाहतूक टेम्पो व इतर वाहनांतून मोहोळ हद्दीतून होत असल्याने, वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई व गुन्हा दाखल न करण्याकरिता दाजीसाहेब काकडे याने तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकरिता मासिक हप्ता म्हणून २५ हजार रुपयांची मागणी केली. याबाबत पटेल व कलबुर्गी या दोघांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानंतर १५ व १६ जून रोजी संबंधित विभागाने पडताळणी केली. तर १७ जून रोजी सापळा कारवाई केली. त्यावरून यातील संशयित दाजीसाहेब काकडेला काल गुरुवारी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मोहोळ पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक चंद्रकांत कोळी, अंमलदार उमाकांत महाडिक, शिरीष सोनवणे, पोलिस नाईक श्रीराम घुगे, नरोटे, हवालदार गायकवाड, श्याम सुरवसे यांच्या पथकाने केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा