जागर न्यूज : राष्ट्रवादीत भूकंप घडवून गेलेल्या अजित पवार यांच्यासह शपथ घेतलेल्या इतर ८ सदस्यांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भातील मागणीची याचिका महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राष्टवादीचे नेते अजित पवार हे गेल्या काही काळापासून वेगळीच हालचाल करीत होते, आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडणार नाही असे सांगत असताना दुसरीकडे काही वेगळ्याच घटना घडत राहिल्या आणि अखेर त्यांनी भाजपशी जवळीक करीत सत्तेच्या खुर्चीवर बसण्यास प्राधान्य दिले. याचे पडसाद राज्यात उमटत असताना आता आणखी घडामोडींना वेग आला आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अत्यंत मोठी माहिती दिली आहे 'महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर आम्हाला माहीत झालं. त्याच क्षणी ते अपात्र ठरले. आम्ही अपात्रतेची याचिका काही वेळापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ती प्रत इमेलद्वारे पाठवली आहे.अपात्रतेच्या याचिकेची प्रत पाठवल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. त्यांना मेसेज केलाय. व्हॉट्सअॅपवरही कॉपी पाठवली आहे. अपात्रतेची याचिका प्रत्यक्ष देण्याची व्यवस्था केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगालाही आम्ही पत्र लिहिलं आहे. पत्राद्वारे सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांची कृती मान्य नाही. पक्षाचा ताबा घेण्याचा दावा सांगतील, पण आम्ही आहोत. राष्ट्रवादी अस्तित्वात आहे अशी कल्पना आधीच पत्राद्वारे दिली आहे, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.शिस्तपालन समितीलाही पत्र लिहिलं होतं. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात सांगितलं. (Disqualification proceedings started with Ajit Pawar) आम्ही त्यानुसार संबंधित सदस्यांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. विधानसभा अध्यक्षांनी उद्या सकाळी आम्हाला बोलावलं पाहिजे. ज्या ९ सदस्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन शपथ घेतली, त्यांच्याविरोधात आम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
जितेंद्र आव्हाड यांना व्हीपचा अधिकार दिला आहे. त्यांचा व्हीप सर्वांना लागू असेल. ते स्वतः विधानसभा अध्यक्षांकडे जाऊन प्रत्यक्षपणे अपात्रतेची याचिका देतील. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मला कोणतीही कल्पना न देता पक्षविरोधी कृती ज्या क्षणी केली, आमच्या पक्षाच्या धोरणांविरोधात जाऊन त्यांनी शपथ घेतली, त्या क्षणी ते अपात्र ठरले आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले.सर्वांना परत यायचंय. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करत नाही. त्यांना थोडा वेळ देऊ. त्यांना काहीच माहीत नाही. कोणत्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या याची कल्पना नाही. शरद पवार हे साताऱ्याला जात आहेत. तेथून ते महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात करतील. ते पुन्हा योद्धा म्हणून सामोरे जात आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. राज्यात आता दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला असून त्याच्या लाटा आता काही काळ उमटत राहणार आहेत. आता पुढे काय होतेय याकडेच महाराष्ट्र लक्ष ठेवून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा