जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा तालुक्यात एका कथित ड्रोनची दहशत निर्माण झाली असून आता मात्र याबाबत वस्तुस्थिती समोर आली आहे.
माढा तसेच मोहोळ तालुक्यातील काही भागात रात्री आठ ते अकरा वाजे पर्यंत ड्रोन सदृश्य वस्तू आकाशातून फिरत असल्याने नागरिकात घबराट पसरली आहे. एक ड्रोन रात्रीच्या वेळी आकाशातून फिरत असून ते घरांची तसेच शेतीची पाहणी करीत आहे असा नागरिकांनी समज करून घेतला आणि यातून घबराट देखील निर्माण झाली आहे. हा नेमका काय प्रकार आहे याबाबत अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि काळजी दिसत आहे. (Alleged drone terror in Solapur district) परंतु यात घाबरण्यासारखे काहीच नसून, ते ड्रोन नसल्याचे समोर आले आहे. ते ड्रोन नसून लहान विमाने असल्याचा निर्वाळा बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी शक्ती सिंग यांनी दिला.
गेल्या आठवड्या भरापासून आकाशात ड्रोन सदृस्य वस्तू फिरताना पापरी ता मोहोळ येथील काही शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी पाहिले. घरापासून सुमारे 60 ते 70 फूट उंचीवरून ते फिरत असून "लेझर लाईट' प्रमाणे त्याचा उजेड पडतो आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक नागरिकांनी या संदर्भात मोहोळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ही माहिती कळविली. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेतली असता बारामती जिल्हा पुणे येथे दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्र आहेत. त्या केंद्राच्या माध्यमातून नवीन वैमानिकांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते व त्यांच्या कडून सराव करून घेण्यात येतो. हे प्रशिक्षण रात्री दिले जाते. ज्या भागात सरावासाठी जायचे आहे तेथील प्रशासनाची परवानगी घेतली जाते. हे ड्रोन नसून लहान विमाने असल्याचे प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक शक्ती सिंग यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा