जागर न्यूज : आषाढीचा सोहळा सुरु झाला असून संतांचे पालखी सोहळे पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत, या पालखी सोहळ्यात चक्क एक गाडगे बाबा अवतरले असून ते महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम करीत पुढे पुढे प्रवास करीत आहेत.
आपल्या किर्तनातून स्वच्छतेचा धडा देत समाजपरिवर्तन करणारे संत म्हणून गाडगेबाबांची सर्वांना ओळख आहे. गाडगेबाबांनी संपूर्ण महाराष्ट्राला स्वच्छतेचा संदेश दिला. त्यांनी केलेल्या या उपदेशाचं महत्त्व आजही कायम आहे. गाडगेबाबा यांच्या विचारानं प्रेरित होऊन सोलापूर जिल्ह्यातले एक वारकरी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छतेचा संदेश देत आहेत.
फूलचंद नागटिळक असं या वारकऱ्याचं नाव आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये गाडगेबाबांचा वेष परिधान करून सहभागी होतात. 'मी रस्ते साफ करताना मानवी मनं साफ करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगलं पाहा, चांगली पुस्तकं वाचा यासाठी माझा प्रयत्न आहे. आषाढी ते पंढरपूर हा वारीचा सोहळा जगाच्या पाठीवर एकमेवद्वितीय आहे. यामध्ये कुणीही लहान किंवा मोठं नाही. आपण स्वच्छतेची वारी करत आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. त्याचबरोबर माणूस म्हणून जगलं पाहिजे, हा माझा प्रयत्न असल्याचं नागटिळक यांनी सांगितलं.
हाती खराटा आणि डोक्यावर गाडगं असा माझा अवतार पाहून लोक मला काही वेळा वेगळ्या नजरेने बघतात. पोलिसही काही वेळा हटकतात. पण व मी संत गाडगेबाबा यांचा अस्सल भक्त आहे. त्यांचे विचार मी नुसते सांगत नाही. तर रस्ते झाडतो. लोकांच प्रबोधन करुन त्यांच्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो, अशी माहिती नागटिळक यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा