जागर न्यूज : आषाढी वारीला सुरुवात झाली असली तरी पंढरीतील तुळशी वृंदावन अजूनही बंदच असून तुळशी वृंदावनाचे दरवाजे केंव्हा खुली होणार अशी विचारणा आता ग्राहक पंचायतीने केली आहे. तुळशी वृंदावन बंद असल्याने भाविकांची कुचंबणा होत असून ते लवकर उघडावे अशी मागणी देखील होत आहे.
तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील बंद असलेले तुळशी वृंदावन भाविकांना पाहण्यासाठी केव्हा सुरू होईल अशी विचारणा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वनविभागाकडे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांना पाहण्यासाठी पर्यटनस्थळ म्हणून शासनाच्या वन विभागाने तुळशी वृंदावनाची निर्मिती केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील विविध संताची मंदिरे, श्रीविठ्ठलाला प्रिय असणाऱ्या विविध प्रकारच्या तुळशीची लागवड, इतर फुलझाडे, तसेच संताची भित्तिचित्रे, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी म्हणून सविस्तर माहिती, त्याचबरोबर कारंजे, म्युझिक लाईट, त्याच परिसरात असलेला यमाई तलाव अशा प्रकारे भाविकांना आनंद मिळण्यासाठी तेथे प्रयत्न केले आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यातील काही मंदिराची पडझड झाल्याने विकसित केलेले हे तुळशी वृंदावन मागील दीड महिन्यापासून बंद आहे. केव्हा सुरू होईल याबद्दल निश्चित माहिती मिळू शकत नाही. सध्या आषाढी यात्रेसाठी विविध मार्गावरून पालख्यांनी पंढरपूरसाठी प्रस्थान केलेले आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी होत आहे. आलेला भाविक दर्शन घेऊन तुळशी वृंदावन पाहण्यासाठी परिवारासह तेथे जात आहे.
मोठ्या अपेक्षेने भाविक गेल्यानंतर तुळशी वृंदावन दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहे असा फलक पाहवयास मिळतो. सोबत आलेली लहान मुले, महिला यांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यासाठी वन विभागाने शहरातील बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, श्रीविठ्ठल मंदिर परिसरात, संत गजानन महाराज संस्थान परिसर, भक्त निवास इ.महत्त्वाच्या ठिकाणी तसेच वृत्तपत्रात प्रसिद्धी देवुनही माहिती जनतेपर्यंत, भाविकांपर्यत पोहचविणे आवश्यक होते तथापि हे काही न झाल्याने भाविकांची घोर निराशा होत आहे. तरी वन विभागाने तुळशी वृंदावन भाविकांसाठी केव्हा चालू होईल याची माहिती त्वरीत प्रसिद्ध करावी अशी मागणी अ. भा.ग्राहक पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा