जागर न्यूज : रात्रीच्या वेळेस लागलेल्या आगीत तब्बल अडीच कोटी जळून खाक झाले असलायची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी रात्रीच्या वेळेस एका दुकानाला आग लागली आणि या आगीने प्रचंड नुकसान केले आहे.
टेंभुर्णी शहरातील जुन्या सोलापूर- पुणे महामार्गावरील शेती उद्योग भांडार व शेती बीज भांडार या नावाच्या शेती उपयोगी खते, बी-बियाणे, औषधे, स्प्रे पंप विक्रीच्या दुकानांस विजेचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, कुर्डुवाडी नगरपालिका व इंदापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने तातडीने आग विझविण्यास सुरवात केल्याने येथील व्यापारी दिलीपचंद धोका यांचे घर व कोहिनूर हाउस ऑफ शॉपी हे कापड दुकान आगीपासून वाचविण्यात यश मिळविले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र दोन्ही दुकानांतील अडीच कोटी किमतीचे साहित्य जळून खाक होऊन मोठी आर्थिक हानी झाली.टेंभुर्णीतील व्यापारी स्वप्नील दिलीपचंद धोका (वय ३८) यांचे जुन्या पुणे- सोलापूर महामार्गावर शेती उद्योग भांडार नावाचे दुकान व गोदाम आहे. या दुकानाशेजारी वडील दिलीपचंद भागचंद धोका यांचे शेती बीज भांडार नावाचे दुकान आहे. या दुकानालगत कोहिनूर हाउस ऑफ शॉपी नावाचे त्यांचे कापड दुकान आहे. या दोन्ही दुकानांच्या वरील मजल्यावर धोका कुटुंबीय राहतात.
सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून धोका हे वरील मजल्यावरील घरी गेले. रात्री साडे अकराच्या सुमारास दुकानासमोरील व्यावसायिक दीपक डोईफोडे यांनी मोबाईलवरून दुकानासमोरील विजेच्या तारांमधून ठिणग्या पडत आहेत, खाली येऊन पाहा असा फोन केला. त्यामुळे स्वप्नील धोका यांनी तातडीने खाली दुकानाचे शटर उघडून पाहिले तेव्हा दुकानात आग लागल्याचे दिसले. आग विझविण्यासाठी बाळासाहेब भोज यांना त्यांचा पाण्याचा टँकर घेऊन बोलावले व आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दुकानातील औषधांमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, कुर्डुवाडी नगरपालिका व इंदापूर नगरपालिकेतील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आमदार संजय शिंदे, धनश्री उद्योग समूहाचे प्रमुख रमेशराव शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी अग्निशमन दलास आग विझविण्याची सूचना करून सहकार्य केले. रात्री बारापासून आग विझविण्यास सुरवात झाली. सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाने कोहिनूर हाऊस ऑफ शॉपी व दिलीपचंद धोका यांचे घर आगीपासून वाचविले.
या आगीत शेती उद्योग भांडार या दुकानातील शेती उपयोगी खते, बी- बियाणे, औषधे, स्प्रे पंप, दुकानातील फर्निचर, कॉम्प्युटर, अकाउंट केबिन, बिले, कोहिनूर हाउस ऑफ शॉपी दुकानाची बिले, दुकानातील संपूर्ण माल व इतर साहित्य असा एकूण अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच दिलीपचंद धोका यांच्या दुकानातील अंदाजे ५० लाख रुपये किमतीची खते, बी- बियाणे, औषधे, स्प्रे पंप संपूर्ण माल व इतर साहित्य जळून खाक झाले. (A shop owner in Temburni suffered a loss of crores in the night fire) याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात स्वप्नील धोका यांनी खबर दिली असून, पोलिस उपनिरीक्षक धनाजी ओमासे तपास करीत आहेत. माढा तालुक्यात या आगीची चर्चा सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा