जागर न्यूज : सद्या सगळीकडे चोऱ्या वाढलेल्या असतानाच तब्बल बारा घरफोड्यांचा तपास करून हे गुन्हे उघडकीस आणून बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविल्याने सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात चोरींचे प्रमाण वाढले आहे, भर दिवसाही चोरी होत असल्याने नागरिक भयभीत आणि असुरक्षित आहेत. चोरीचे प्रकार वाढल्याने नागरिक पोलिसांकडे बोट दाखवत असतानाच सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांच्याकडून सोलापूर ग्रामीणच्या दोन अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात झालेल्या १२ घरफोड्या उघड करुन जवळपास १२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केल्याची कामगिरी केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रणजित माने यांचा पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी प्रशस्तीपत्रक देवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
मंगळवेढा शहरात जानेवारी महिन्यापासून सायंकाळी ६ ते रात्री ८ च्या दरम्यान शिक्षक कॉलनी, मित्रनगर, वनराई कॉलनी,सप्तशृंगीनगर, नागणेवाडी, चैतन्य कॉलनी, बनशंकर कॉलनी, तसेच ग्रामीण भागात अचानक भरदिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले. सदर ठिकाणातील रहिवासी दवाखान्याला अथवा कार्यक्रमाला बंगल्याला कुलूप लावून गेल्यानंतर चोरटे कुलूपबंद बंगले शोधून त्यांना लक्ष करीत असे. भरदिवसा चोर्यांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणेही मुश्किल झाले होते.
दरम्यान हे वाढते चोरीचे प्रकार लक्षात घेवून उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी पोलीसांचे पथक तयार करुन चोरटयांची शोध मोहिम राबविली. (Crimes of theft exposed, glory of police officers) पोलीसांनी स्थानिक गुन्हे करणार्यांकडे गांभीर्यपुर्वक लक्ष ठेवून तांत्रिक बाबीचे गोपनीय बातमीदाराबाबत माहिती काढून दोघांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून १२ घरफोड्या उघडकीस आणून १२ लाखाचे २५ तोळ्याचे दागिने जप्त करण्यात पोलीसांना यश आले.
दरम्यान मित्रनगर मध्ये एका व्यापार्याच्या दुकानाजवळ सी.सी.टी.व्ही कॅमेरेचे फुटेज ताब्यात घेवून ते पोलीसांनी चेक केले असता त्यामध्ये दोन मुले वारंवार त्या भागातून वारंवार चकरा मारत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपासाला भक्कम दिशा मिळाली व त्यातून बारा घरफोड्या उघड करण्यात पोलीसांना यश आले. या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे,अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील,पोलीस निरीक्षक रणजित माने आदींना या कामगिरीबद्दल त्यांना प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. जिल्ह्यात विविध भागात चोऱ्या होत असून अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. त्या चोऱ्यांचा तपास कधी लागणार आणि तेथील अधिकाऱ्यांचा असा गौरव कधी होणार ? हे आता पाहावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा