जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत असताना दुसरीकडे लंपी आजाराने चिंता वाढवली असून तीन तालुके हॉटस्पॉट म्हणून समोर येताना दिसत आहेत.
लंपीच्या आजाराने अलीकडेच शेतकरी बांधवांची चिंता वाढवली होती, लंपीचा प्रभाव काहीसा कमी झाला होता आणि आता पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे. रुग्ण वाढत असताना अजूनही लोक गंभीरपणे घेत नसल्याचे दिसत आहे. त्यातच आता पुन्हा लंपीचा प्रभाव दिसू लागला असून सोलापूर जिल्ह्यातील तीन तालुके आघाडीवर आहेत. लम्पीने जनावरांवर तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. अक्कलकोट, मोहोळ व मंगळवेढा हे तीन तालुके लम्पीचे नवे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत. जिल्ह्यात सध्या लम्पीचे ६७७ ॲक्टिव बाधित पशुधन आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक ३८६ पशुधन हे या तीन तालुक्यांमध्ये आहे.
लम्पीने सुरवातीच्या टप्प्यात माळशिरस, सांगोला व करमाळा या तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. आता या तालुक्यांमधील लम्पी आटोक्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १५४ लम्पी बाधित पशुधन मोहोळ तालुक्यात आहे. त्या खालोखाल मंगळवेढा तालुक्यात १४० तर अक्कलकोट तालुक्यात ९२ लम्पीबाधित पशुधन आहे. जिल्ह्यातील ३९ हजार ५७० पशुधनाला लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी ३५ हजार २३५ पशुधन सध्या लम्पीमुक्त झाले आहे.
लम्पीमुळे जिल्ह्यातील ३ हजार ६८५ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक १ हजार ३१२ मृत्यू माळशिरस तालुक्यात झाले आहेत. अक्कलकोट तालुक्यात ६०, मोहोळ तालुक्यात २१७ तर मंगळवेढा तालुक्यातील २०१ जनावारांचा आतापर्यंत लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १९१ मृत जनावारांच्या मालकांना जिल्हा प्रशासनाच्यातीने ७ कोटी ६० लाख सहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अनुदान वाटपाचे ४५२ प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. या प्रस्तावांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जवळपास एक कोटी २० लाख रुपयांचे अनुदान वाटप केले जाणार आहे. जिल्ह्यात शेतकरी आर्थिक अडचणीत अहे. आस्मानी अन् सुलतानी संकटांनी तो पिचला आहे. अशातच लम्पीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे तो अधिकच अडचणीत आला आहे. लंपीच्या प्रभावाने शेतकरी या वेगळ्या चिंतेत अडकू लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा