जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या, आंतरराज्य टोळीला पकडण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले असून, तब्बल ५४ दिवस आणि तीन हजार किमी प्रवास करून पोलिसांनी हे मोठे यश संपादन केले आहे.
सोलापूर जीओळ्यातील बार्शी, मोहोळ, तसेच सांगली, नागपूर, कलबुर्गी व सायराबाद (तेलंगण) या ठिकाणी घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीला आणि अक्कलकोट (मड्डी वस्ती, सुलेरजवळगे) येथे दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील चोरट्याला ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांच्या पथकांनी तब्बल ५९ लाख ८८ हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुलेरजवळगे गावाजवळील मड्डी वस्तीतील भानुबाई अमोगसिद्ध ख्यामगोंडे यांच्या घरातून २० ऑगस्ट २०२२ रोजी कडीकोयंडा तोडून चोरट्याने दागिने चोरून नेले होते. त्याचवेळी त्या परिसरातील पाच घरे फोडून चोरट्याने एकूण एक लाख ६७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
बार्शीतील ममता शाळेजवळील राजकुमार काशिनाथ बागलकर यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल सात लाख ८९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलिसांकडे चोरट्यांबद्दलचा काहीच पुरावा नव्हता. पण, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी तांत्रिक बाबी व सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अनिस शेख, अक्षय दळवी, व्यंकटेश मोरे, अक्षय डोंगरे व चालक समीर शेख यांच्यासह मध्यप्रदेश गाठले.
तीन हजार किलोमीटरचा प्रवास केला, १५ दिवस वेगवेगळ्या ठिकाणी तपास केला. अखेर धुळे जिल्ह्यातील एका हॉटेलजवळून दोघांना पकडले. त्यानंतर एक साथीदार व सराफ व्यापाऱ्याला जेरबंद केले. बार्शी, मोहोळ, सांगली, कलबुर्गी, नागपूर व तेलंगणातील घरफोडीतील तब्बल १५७९ ग्रॅम सोने, चांदीची तीन ताटे, चार लाखांची रोकड व एक कार, असा ५४ लाख ५४ हजार ६५६ रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात पथकाला यश आले.
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक फौजदार बिराजी पारकर, श्रीकांत गायकवाड, पोलिस हवालदार सलीम बागवान, आबासाहेब मुंढे, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोलिस नाईक रवी माने, समर्थ गाजरे, विनायक घोरपडे, सुनंदा झळके, दिलीप थोरात यांचे पथक नेमले. सायबरचे पोलिस नाईक व्यंकटेश मोरे यांचीही मदत घेण्यात आली.या पथकाने अनिल श्रीमंत पवार (रा. पानमंगरूळ, ता. अक्कलकोट) याला जेरबंद केले. (Inter-state gang arrested by Solapur rural police) पोलिसांनी अक्कलकोट दक्षिण, उत्तर पोलिस ठाणे व मोहोळ पोलिस ठाण्यात दाखल एकूण सहा गुन्ह्यांतील पाच लाख ३४ हजार १९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. दोन्ही पोलिस पथकाला पोलिस अधीक्षकांनी ३५ हजारांचे बक्षीस जाहीर केले. या पत्रकार परिषदेसाठी अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, परिविक्षाधिन अधिकारी रोहिणी बनकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा