जागर न्यूज : पैसे दुप्पट करून देतो असे सांगून तब्बल पंचवीस लाखांचा चुना लावल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात उघडकीस आला असून या प्रकाराने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषाने 25 लाख रुपये गुंतवले, त्यातील फक्त 66 हजार रुपये परत देऊन 24 लाख 34 हजार रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार माधुरी अशोक खाडे (रा. समर्थ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे वासद रोड, सांगोला) यांनी संतोष जनार्दन शिंदे (रा. वासुद, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध केली आहे.फिर्यादी माधुरी अशोक खाडे यांचे सांगोल्यातील वासुद रोड वरील न्यू इंग्लिश स्कूल समोर किराणा दुकान होते. कोरोनानंतर हे दुकान बंद केले. दुकान चालवत असताना संतोष जनार्दन शिंदे यांची ओळख झाली होती. संतोष शिंदे यांनी त्याचे स्वतःचे एस. एस. फायनान्स आहे असे फिर्यादीस सांगितले होते. फिर्यादीने त्याच्या फायनान्स मधून 2018 साली दहा हजार रुपये घेतले होते व ते पैसे वेळेतही फेडले होते.
संतोष शिंदे यांनी त्यानंतर फिर्यादीस तुमची पैशाची अडचण असेल तर माझ्याकडे पैसे गुंतवा मी तुम्हाला पैसे डबल करून देतो असे सांगितले होते. फिर्यादी माधुरी खाडे यांनी 5 ऑक्टोबर 2019 सालापासून 25 जानेवारी 2021 सालापर्यंत वेळोवेळी संतोष शिंदे यास चेकने व रोख दुकानातील असे मिळून एकूण 25 लाख रुपये दिले होते.फिर्यादीने हे पैसे परत मागितले असता संतोष शिंदे यांनी फिर्यादीस वेळोवेळी फक्त 66 हजार रुपये परत दिले. उर्वरित 24 लाख 34 हजार रुपयाची फिर्यादीने वेळोवेळी मागणी केली असताना शिंदे यांनी वेगवेगळी कारणे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. वारंवार पैसे परत मागितल्याने संतोष शिंदे यांनी फिर्यादीस त्यांच्या नावाचा चेक दिला होता.
फिर्यादीने तो चेक बँकेत टाकले असता खात्यात अपुरी रक्कम असल्याने चेक न वटता परत आले आहेत. (Fraud of lakhs of women by doubling the money) त्यामुळे फिर्यादी माधुरी खाडे यांनी संतोष जनार्दन शिंदे यांच्याविरुद्ध चेक द्वारे व रोखीने 25 लाख रुपये घेऊन फक्त 66 हजार रुपये परत देऊन उर्वरित रक्कम 24 लाख 34 हजार रुपये परत न देता फसवणूक केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा