जागर न्यूज : आठवडा बाजारातून मोबाईल आणि दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा सांगोला पोलिसांनी छडा लावला असून त्यांच्याकडून चोरीच्या दुचाकी आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
हार्दिक शुभेच्छा !
दुचाकी आणि मोबाईल चोरांचा सगळीकडेच सूळसुळाट असून पोलीस सतत दुचाकी चोरांच्या टोळ्यांना गजाआड पाठवत आहेत परंतु दुचाकीच्या चोऱ्या काही थांबत नाहीत. थोड्या वेळेसाठी जरी गाडी कुठे उभी केली तरी चोरीला जाण्याची भीती असल्याने दुचाकी वापरणे देखील आता अडचणीचे ठरू लागले आहे. मोबाईलच्याही चोऱ्या सतत होत असतात परंतु सांगोला पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारातून दुचाकी व मोबाईल चोरणारी टोळी सांगोला पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात तीन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार दुचाकींसह २१ मोबाईल हँडसेट, असा एकूण पाच लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महूदसह सांगोला तालुक्यातील आठवडा बाजारात या चोरट्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले होते.
महूद येथील यश हनुमंत कारंडे यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास मंगळवेढ्याचे पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील व सांगोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होता. चोरांचा छडा लावण्यासाठी एक स्वंत्र तपास पथक तयार करण्यात आले होते. बागलवाडी व अचकदाणी (ता. सांगोला) येथील दोन व्यक्ती त्यांच्याकडील कागदपत्रे नसलेल्या दुचाकी कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यांकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्याकडील विनाक्रमांकाची दुचाकी महूद(ता. सांगोला) येथून चोरी केल्याचे समोर आले. त्यांच्याकडे अधिक तपास केल्यावर इतर दोन साथीदारांना सोबत घेऊन जत, कोल्हापूर, कर्नाटक येथून दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्या साथीदारांनाही जेरबंद केले. या गुन्ह्यात तीन संशयितांसह एक अल्पवयीन बालक देखील आहे.
सांगोला येथील आठवडा बाजारातून शिवणे येथील तानाजी हरीबा घाडगे यांचा मोबाईल चोरट्याने चोरून नेला होता. मोबाईल चोरणारी महिला पानवन (ता. माण, जि. सातारा) येथील असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पानवन येथे जावून त्या महिलेस ताब्यात घेतले. (Police caught a gang of bike and mobile thieves) तिच्याकडून सांगोला तालुक्यातील विविध आठवडा बाजारातून व इतर ठिकाणाहून चोरलेले वेगवेगळ्या कंपनीचे तीन लाख ९७ हजार ५०० रुपयांचे तब्बल २१ मोबाइल हस्तगत केले. दरम्यान, मोबाईल आणि दुचाकी चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीचा छडा लावण्यात सांगोला पोलिसांना यश आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा