जागर न्यूज : हॉटेलमध्ये बेकायदा दारू विकणे आणि तेथे बसून मद्यप्राशन करणे हे सहा जणांना पुन्हा एकदा भलतेच महागात पडले असून हॉटेल मालकाला आणि ग्राहकांना मोठा दंड न्यायालयाने सुनावला आहे.
परवानगी नसताना हॉटेल, ढाबे अशा ठिकाणी सर्रास मद्यविक्री केली जाते आणि अनेक ग्राहक येथे मज्जा मारत बसलेले असतात पण उत्पादन शुल्क विभागाने अलीकडे धाडी टाकून कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे त्यामुळे अशा व्यावसायिकांचे धाबे दणाणलेले आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक हॉटेल व्यावसायिकांना आणि हॉटेलमध्ये बसून मद्यप्राशन करणाऱ्याना मोठा फटका बसला आहे. यामुळे काही प्रमाणात हे कमी झाले असले तरी अजूनही काही ढाबे आणि हॉटेल्समधून बेकायदेशीर दारू विक्री केली जाते आणि तेथे बसून ग्राहकांना पुरवलीही जाते. अशा ठिकाणावर सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभाग धाडी टाकून कारवाई करीत आहे. सोलापुरातील हॉटेल आणि ग्राहकांना पुन्हा एकदा असाच दणका बसला असून न्यायालयाने मोठा दंड सुनावला आहे त्यामुळे पुन्हा एकदा तळीराम मंडळीत खळबळ उडाली आहे.
शहरातील हॉटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शहरातील मजरेवाडी होटगी रोडवरील हॉटेल फ्रेंड्स या ठिकाणी धाड टाकली असून यात ढाबा चालकासह मद्यपान करणाऱ्या ६ मद्यपी ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने मद्यपींना प्रत्येकी दोन हजार तर हॉटेल चालकाला २५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली.३ मार्च शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने मजरेवाडी होटगी रोडवरील रेल्वे रुळाशेजारील हॉटेल फ्रेंड्समध्ये धाड टाकून हॉटेल चालक प्रणय कल्लाप्पा जमादार ( वय ३२, रा. सैफुल) याच्यासह मद्यपी ग्राहक पांडुरंग विठ्ठल माने, गणेश दिलीप पुकाळे, आदित्य युवराज चंदनशिवे, म्हाळसाकांत मोहन पवार, श्रीकांत दत्तात्रय पाटील व अंकुश तुकाराम वरवटे यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दारूच्या बॉटलसह एकूण १४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करून अधिकार्यांनी ४ मार्च रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले असता न्यायदंडाधिकारी नम्रता बिरादार यांनी तात्काळ निकाल देत ढाबा चालकाला २५ हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार असा एकूण ३७ हजारांचा दंड ठोठावला. (Liquor sale in the hotel, fined six customers including the owner ) ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, सुनील कदम, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, सुनील पाटील , सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, जवान प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईने अनेकांच्या झोप उडविल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा