जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असताना पंढरपूरसह माढा आणि मोहोळ तालुक्यातही पुन्हा एकदा कोरोनाने प्रवेश केला असून वेळीच काळजी आणि दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोन अडीच वर्षे जगभरात कोरोनाने प्रचंड विध्वंस आणि नुकसान केलेले असून कोरोनाचे नाव ऐकले तरी धडकी भरत आहे. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत अनेक जीव या कोरोनाने घेतलेच शिवाय वृद्ध व्यक्तींना तर प्रचंड धोका दिला आहे. माणसांचे जीवन जागीच ठप्प करून सगळीच चक्रे जागेवर थांबवली होती. दोन वर्षाच्या कोरोनाने माणसाला कित्येक वर्ष मागे लोटले असून त्यातून पूर्णपणे सावरण्यासाठी आणखी काही काळ जावा लागणार आहे. कोरोना परतल्याने सुटकेचा निश्वास टाकला असतानाच पुन्हा सोलापूर जिल्ह्यात कोरोना आपले हातपाय पसरू लागला असून सोलापूर शहरासह ग्रामीण भागातही त्याचे आगमन झाले आहे. यात पंढरपूर, मोहोळ आणि माढा तालुक्यांचाही समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून थांबलेली कोरोनाची रुग्णसंख्या सोलापुरात पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. शनिवारी दोन रूग्ण सोलापुरात कोरोना बाधित आढळून आले. यात एका १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. सध्या कोरोनाचे १९ बाधित रूग्ण सोलापुरात आहेत. या रुग्णांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे.सणासुदीच्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शुक्रवारी एकूण १४८ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला. त्यात २ लोक पॉझिटिव्ह आढळून आले. सध्या रॅपिड ॲन्टिजेन व आरटीपीसीआर टेस्टव्दारे तपासणी करण्यात येत आहे.
वयोगटानुसार ० ते १५ वयोगटातील १ तर ५१ ते ६० पेक्षा अधिक वय असलेला एकजण शनिवारी कोरोनाबाधित झाला. यात एक स्त्री व एक पुरूष रूग्ण आहे. घरात विलगीकरण असलेल्या रुग्णांची संख्या १९ आहे असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. सोलापूर जिल्ह्यात माढा, मोहोळ, पंढरपूर या तीन तालुक्यात प्रत्येकी एक अशा तीन कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपर्यंत १ लाख ८७ हजार ४११ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी ३ हजार ७३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर १ लाख ८३ हजार ६७८ जण कोरोनातून बरे झाले. सध्या ग्रामीण भागातील तिघांवर उपचार सुरू आहेत.
आत्ता कुठे लोक कोरोनाला विसरून आपल्या नित्याच्या कामात गुंतू लागले होते तोच पुन्हा नव्या विषाणूची धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाची डोकेदुखी कमी झाल्याने मोकळा श्वास घेत असतानाच आता पुन्हा एकदा मास्क वापरण्याची वेळ आली आहे. (Corona once again entered Pandharpur taluka) भारतात नव्या H3N2 इन्फ्लूएंझा (H3N2 Influenza) विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. देशात ३ हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळले आहेत, त्यामुळेच आरोग्य मंत्रालयाने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा