जागर न्यूज : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या एका तरुणाचा पोलीस भरतीसाठी व्यायाम करीत असतानाच अपघाती मृत्यू झाला असून रस्त्यावर व्यायाम करताना पुरेशी खबरदारी घेण्याची आवश्यकता पुणध एकदा अधोरेखित झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात एका तरूणाचा पहाटे व्यायामाला गेला असता चारचाकीच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सूरज अशोक कांबळे असं मृत तरूणाचं नाव आहे. सूरजचं लहापणापासून पोलीस व्हायचं स्वप्न होतं. त्यासाठी तो अहोरात्र कष्ट करत होता. मात्र, आज पहाटे तो व्यायामाला गेला असता वाटेतच त्याचा अपघाती मृत्यू झाला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात असणाऱ्या अलमला येथे सूरजचा जन्म झाला. लहानपणापासून सूरजला पोलीस दिसले की मोठे कौतुक वाटायचे. आपणही मोठं झाल्यावर पोलिसच होणार असल्याचं तो आई वडिलांनाच नव्हे तर प्रत्येकाला सांगायचा. लहानपणी पोलिसांचा पोषाखही तो हट्टाने घालायचा. त्याच्या या कृतीचं अन् निर्णयाचं सर्वांनाच मोठं अप्रूप वाटायचं. पोलीस व्हायचं स्वप्न उराशी बाळगूनच सूरज मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण केलं.त्यानंतर पोलीस भारतीसाठी तो अहोरात्र प्रयत्न करू लागला.
काही करून पोलिसात भरती व्हायचेच या निर्धाराने नियमित अभ्यास अन् मैदानी कसरती सूरज न चुकता करू लागला. आजही तो भल्या पहाटे व्यायामासाठी घराच्या बाहेर पडला पण तो कायमचाच. लातूर - औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील अलमला मोड येथे सूरज शारीरिक कसरती करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने सूरजला चिरडलं आणि सूरजचं पोलीस व्हायचं स्वप्न क्षणात भंगले. सूरजचा जागीच मृत्यू झाला.
सूरजसोबत शारीरिक कसरती करणारा त्याचा मित्र देखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (A young man practicing for police recruitment dies on the road) औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, सूरजच्या अपघाती निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अलमला गावावर शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा