जागर न्यूज : उन्हाळ्याला सुरुवात होत असतानाच हवामान विभागाने चिंता वाढवली असून यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य आग ओकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात भारतात अल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यूएस नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने गेल्या आठवड्यात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये अल निनो परिस्थिती निर्माण होण्याची ५० टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. तर अल निनोची परिस्थिती भारतात प्रचलित असण्याच्या शक्यतेवर NOAA ने म्हटले आहे की, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक म्हणजे ५८ टक्के आहे.
जरी एल निनोचा संबंध कमी पावसाशी असला तरी उपलब्ध आकडेवारीवरून लवकर अंदाज बांधता येणार नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मान्सूनवर अल निनोच्या प्रभावाचा परिणाम एप्रिल-मे महिन्यातच समोर येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
तापमान जास्त राहणार !
एका तज्ज्ञाने असा इशारा दिला आहे की भारतात यावर्षी कडक उन्हाळा पडू शकतो. “हा वसंत ऋतू तितका वाईट नसेल पण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात तापमान खूप वाढू शकते,” असे वृत्त 'हिंदुस्तान टाईम्स' ने दिले आहे. यात स्कायमेटचे हवामान आणि हवामानशास्त्राचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीचा उल्लेख करण्यात आला आहे.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम राजीवन यांनी देखील २०२३ मध्ये “कडक उन्हाळा” असेल असे म्हटले आहे. गेल्या वर्षी भारतातील किमान नऊ शहरांत ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली होती. भारतीय हवामान विभागाने भारताच्या उत्तर, वायव्य आणि पूर्व भागात तीव्र उष्णतेच्या लाटेची (Heat wave) शक्यता असल्याचा इशारा दिला होता.एनओएएने त्यांच्या जानेवारीच्या अंदाजात या वर्षी एल निनो परिस्थितीची शक्यता असल्याचे संकेत पहिल्यांदा दिले होते. संशोधकांनी ला निनाच्या सलग तीन वर्षांच्या परिस्थितीनंतर यावर्षी एल निनोची शक्यता वर्तवली आहे.
एल निनो आणि ला निना
प्रशांत महासागरातील तापमानात जो चढ-उतार होतो त्याचा संबंध भारतीय मान्सूनशी आहे. एल निनो आणि ला निना हे उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील हवामानाच्या नमुन्याचे उबदार आणि थंड टप्पे आहेत. एल निनोचा संबंध पाण्याच्या असामान्य तापमानवाढीशी आहे. तर ला निनामुळे प्रशांत महासागराच्या विषुवृत्तीय भागात तापमान कमी प्रमाणात होते. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे भारतात पाऊस कमी पडतो. (Summer-will-be-more-intense-forecast-meteorological-department) भारतात २०१८ मध्ये शेवटची एल निनो स्थिती पहायला मिळाली होती. त्यानंतर एल निनो स्थिती निवळली आणि भारतात सलग चार वर्षे मान्सूनचा पाऊस चांगला झाला. २०२२ च्या हिवाळ्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येऊन गेली. पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी आणि गारपिटीचा कालावधी वाढल्याने थंडीत वाढली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा