जागर न्यूज : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे राजकारणापासून दूर जात असतानाच भारतीय जनता पक्षाच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे शिंदे यांची सोलापूर लोकसभा निवडणूक लढवावी अशी गळ युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यानी घातली आहे.
राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि केंद्रात देखील मोठी पदे उपभोगल्यानंतर गेल्या काही काळापासून कॉंग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे राजकारणापासून दूर जाताना दिसत आहेत. भाजपचा प्रभाव आणि कॉंग्रेसची पीछेहाट यामुळे शिंदे देखील राजकारणापासून अंतर ठेवून असल्याचे दिसते. लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणुकीच्या राजकारणातून ‘ब्रेक’ घेतला. पण, भाजप खासदारांविषयीची जनतेतील नाराजी व जनतेची मागणी, याचा विचार करता आगामी निवडणूक आपणच लढवावी, असे साकडे युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटून घातले.
मोदी लाटेत लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ॲड. शरद बनसोडे यांच्याकडून प्रथमच सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर आणि शिंदे यांच्यातील मतविभाजनाचा फायदा पुन्हा भाजपला झाला आणि शिंदे पुन्हा पराभूत झाले. दरम्यान, केंद्रातील सोलापूर विकासाची मोठी कामे शिंदे यांच्या माध्यमातूनच मार्गी लागतील, अशी आशा सोलापूरकरांना आहे, त्यामुळे निवडणुकीच्या राजकारणापासून लांब गेलेले शिंदे यांनीच आगामी लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी काँग्रेसच्या शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पूर्वीपासून होत आहे.
भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी आणि माजी खासदार ॲड. शरद बनसोडे यांच्या कार्यकाळात सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकही भरीव काम झालेले नाही. दरम्यान, ॲड. महास्वामी जातीच्या बनावट दाखल्यावरून न्यायालयीन लढाई लढत आहेत. त्यामुळे भाजपचा आगामी उमेदवार शिंदे यांना टक्कर देईल, असा असणार नाही, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, मागील काही दिवसांपासून शिंदे यांचा सोलापूर शहर आणि जिल्ह्यात राजकीय व सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्क वाढला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेत सुमारे २१ किलोमीटर पायी चालत ‘आपण अजूनही फिट आणि तरुण आहोत’ असे त्यांनी बोलून दाखवले आहे. त्यामुळे युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केलेली मागणी शिंदे मनावर घेतील का, याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.
मकर संक्रांतीचे औचित्य साधत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची सोलापुरातील त्यांच्या 'जनवात्सल्य' या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शिंदे यांना पत्राद्वारे लोकसभा निवडणूक लढण्याची मागणी केली. (Sushil Kumar Shinde to contest Solapur Lok Sabha election, demand) यावेळी निवेदन देताना काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अंबादास करगुळे, सोलापूर शहर मध्यचे युवक कॉंग्रेस अध्यक्ष वाहिद विजापुरे यांच्यासह युवक कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा