जागर न्यूज : जिल्हा नियोजन अंतर्गत मिळालेला निधी खर्च न करणाऱ्या अधिकाऱ्यावर आता थेट कारवाईच करण्यात येईल असा इशाराच सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.
जिल्हा नियोजानांतर्गत विविध विभागांना निधी दिला जातो पण तो खर्च करण्याऐवजी तसाच अखार्चिक म्हणून पडून राहतो. अनेक अधिकारी याकडे लक्ष देत नसल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीच आता यात लक्ष घातले आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून तांत्रिक अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. आता यासाठी तोंडी सूचना बंद आहेत. यापुढे थेट कारवाईद्वारे सूचना देण्यात येतील, असा इशारा जि. प. सीईओ दिलीप स्वामी यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतरावचव्हाण सभागृहात जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे अधिकारी यांच्या समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पंडित भोसले, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, कृषी अधिकारी कुंभार, प्रभारी प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वामी यांनी आवश्यक सूचना केल्या. या बैठकीस अनुपस्थित असलेल्या पशुसंवर्धन विभागाचे चार अधिकारी, बालविका प्रकल्प अधिकारी १ व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत सन २०२१-२२ मधील निधी अखर्चित राहिल्यास संबंधित तांत्रिक अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. सर्व निधी वेळेत खर्च होईल, याची दक्षता घ्या. जी कामे सुरू होत नाहीत त्या कामाचे रद्दचे प्रस्ताव गटविकास अधिकारी यांनी पाठवून द्यावेत, अशा सूचनादेखील सीईओ दिलीप स्वामी यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात घरकुलांची कामे वेळेत का होत नाहीत, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनचे आराखडे सादर करूनदेखील तांत्रिक मान्यता का देण्यात आली नाही, सार्वजनिक शौचालयांची कामे प्रलंबित का आहेत, १५ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च का होत नाही, अपूर्ण बांधकामे वेळेत का होत नाहीत, (Spend funds or else a direct warning to take action) अशा प्रश्नांची सरबत्ती यावेळी दिलीप स्वामी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर केली. स्वामी यांनी आता थेट कारवाई काण्याचा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा