सांगोला : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करीत सांगोला तालुक्यात ११ लाख रुपये किमतीची गोवा निर्मित दारु पकडली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अलीकडे अशा कारवाया सतत होत असून गोव्यातून महाराष्ट्रात आणण्यास प्रतिबंध असलेली दारु पकडली जात आहे. या कारवाईमुळे चोरट्या व्यावसायिकांनी धसका घेतलेला असतानाच सांगोला - मिरज मार्गावर पुन्हा मोठी कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथकाने उदनवाडी (ता. सांगोला) येथे एका मालवाहतूक टेंपोमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारुच्या १८० पेट्या जप्त केल्या आहेत.अवैध व बनावट दारुला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून धडक कारवाई करण्यात येत असून ही आणखी एक कारवाई करण्यात आली आहे.
सदर दारू वाहतुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भरारी पथकाचे निरिक्षक सुनिल कदम यांनी त्यांच्या स्टाफसह ३ जानेवारी मंगळवारी सांगोला- मिरज रोडवरील उदनवाडी गावाच्या हद्दीत सापळा रचून एका टाटा कंपनीच्या एन्ट्रा V30 क्र. MH 42 BF 0467 या मालवाहतूक टेंपोमधून गोवा बनावटीचे एड्रीयल व्हिस्की विदेशी दारुच्या ७५० मिली क्षमतेच्या २१६० सीलबंद बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुन्ह्यात दहा लाख एंशी हजार किंमतीची दारु जप्त केली असून आरोपी सतिश भानुदास सूर्यवंशी, वय ३२ वर्षे, रा. कळाशी ता. इंदापूर जि. पुणे याला अटक करण्यात आली असून त्याचा एक साथीदार फरार आहे.
सदर आरोपीने ही विदेशी दारु भाताच्या कोंड्याच्या गोण्यांच्या साहाय्याने वाहनाच्या पाठीमागच्या हौदात लपवून आणली होती. या गुन्ह्यात टाटा टेंपोसह एकूण सतरा लाख ब्याण्णव हजार किंमतीचा मुद्देमाल विभागाने जप्त केला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उप आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सुनिल कदम, संदिप कदम, दुय्यम निरिक्षक सुनिल पाटील, कैलास छत्रे, जवान नंदकुमार वेळापुरे, प्रकाश सावंत, तानाजी काळे व वाहनचालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली.
सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री ठिकाणे, हातभट्ट्या, धाबे, हॉटेल तसेच गोवा राज्यातून तस्करी होणा-या दारूवर विभागाने लक्ष केंद्रित केले असून त्याविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आलेली आहेत. तसेच रात्रंदिवस सदर पथकाद्वारे पाळत ठेवण्यात येत असून अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. (Goa liquor worth eleven lakhs seized in Sangola taluka) अवैध दारूची माहिती मिळाल्यास या विभागास संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा