जागर न्यूज : प्रेम आंधळं असतं याचा एक वेगळाच अनुभव आला असून केवळ प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी दुकाचीची चोरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हटलं जात असलं तरी प्रेमात आणि प्रेमासाठी केलेले गुन्हे मात्र माफ होत नसतात आणि कितीही कौशल्याने गुन्हे केले तरी एक दिवस सगळे चव्हाट्यावर येतेच. प्रेमासाठी अनेक गंभीर गुन्हे केल्याचे आपल्या आजूबाजूला नेहमी दिसते पण प्रेयसीच्या हट्टासाठी तीन प्रेमाविरानी चक्क चोरीचा फंडा निवडला आणि पोलिसांच्या तावडीत सापडले. आपल्या प्रेयसीचे हट्ट पुरविण्यासाठी दारू पिऊन अकरा लाखाच्या ९ दुचाकी चोरल्याचा एक प्रकार उघडकीस आला आणि पोलीस देखील चक्रावले. या चोरट्या प्रेमवीरांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि त्यांचे कथित प्रेम देखील विस्कटून गेले.
नारायण रामराव भंडारे (२१), कृष्णा ज्ञानोबा होळकर (२४), अर्जुन मधुकर वाकळे (२४, रा. तिघेही राजणगांव शेणपूजी) अशी तिघा प्रेमवीर आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, मद्यपान करून तिघे चोरटे दुचाकी चोरत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी ओॲसिस चौक परिसरातून नारायण भंडारे यास पकडले. तर उर्वरित दोघे कृष्णा आणि अर्जुन हे दोघे राहत्या घरी सापडले. त्यांची चौकशी केली असता प्रेयसींचे हट्ट पुरविण्यासाठी शहरातील घाटी दवाखाना, पैठण गेट, एमआयडीसी वाळूज परिसरातून अनेक दुचाकी खरेदी करून विक्री केल्याचे तसेच काही दुचाकी राहत्या घरी ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी घर गाठत तब्बल आठ लाख ९० हजार रुपयांच्या ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरीच्या दुचाकींसंदर्भातील गुन्हे अभिलेख तपासला असता, सदर दुचाकी एमआयडीसी वाळूज, बेगमपुरा, क्रांती चौक, लिमगाव नांदेड पोलिस ठाण्याच्या दाखल गुन्हे उघडकीस आले. तिन्ही प्रेमवीर आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, विठ्ठल जवखेडे, दत्तात्रेय गडेकर, ज्ञानेश्वर पवार, परभत म्हस्के, संदीप बीडकर, विजय भानुसे, नितीन देशमुख, तात्याराव शिनगारे, अजय चौधरी, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.
तिन्ही आरोपी हे मुळचे हिंगोली जिह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. कुटुंबीयांसोबत ते रांजणगाव शेणपूंजी भागात राहतात. तिघेही २४ तास सोबत राहून मद्यप्राशन करून तर्रर्र वाळूज औद्योगिक वसाहतीत परिसरात फिरत असत. चोरीच्या दुचाकी विक्री करून पैसे आल्यानंतर मौजमजा करून त्यात उडवत असत. दरम्यान तिघांनाही ‘शेअर चॅट’ या ॲपद्वारे काही मुलींच्या ओळखी झाल्या. मुलीही पैशाला भाळून मोबाईल क्रमांक देवघेव होऊन भेटीगाठी झाल्या. विशेष म्हणजे ओळखीचे प्रेमात रूपांतर होण्यासाठी ‘खर्च’ करावा लागतो म्हणून आरोपींनी दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता.
तिघा आरोपींनी वर्षभरात एकदाही हॅन्डल लॉकची तोडफोड करून दुचाकी चोरली नाही. तर ‘मास्टर की’ घेऊन ते चार पाच दुचाकींना लावून दुचाकी सुरु झाली की पळवीत असत. सर्व दुचाकी अशाच चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे दुचाकी पार्क करताना ‘हॅन्डल लॉक’ सोबतच दुसरे मेटल लॉकसारखे लॉकही लावण्याचे आवाहन उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी केले आहे. ( The young man became a thief to satisfy his girlfriend's insistence) प्रेयसीसाठी या तरुणांनी केलेला प्रकार त्यांच्या भलताच अंगाशी आला असून आता प्रेयसीही दुरावल्या आणि तुरुंगाची हवा मात्र नशिबी आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा