जागर न्यूज : शाळांच्या सहलीसाठी आता पालकांची समती आणि सहलीसाठी जाणाऱ्या मुलांचा विमा आवश्यक करण्यात आला असून शिक्षाधिकारी यांनी तसे आदेशच काढले आहेत.
नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात शाळांच्या शैक्षणिक सहली निघतात. शाळा आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी या सहलींचा आनंद लुटत असतात पण या सहलीसाठी आता काही नियम आवश्यक करण्यात आले आहेत. यासंबंधी सोलापूर शिक्षणाधिकारी यांनी काही महत्वाचे नियम लागू केले असून त्यासंबंधी एक आदेश पारित करण्यात आला आहे. शैक्षणिक सहली काढताना संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असते. दुसरीकडे, सहलीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची संमती आवश्यक आहे.
शाळांच्या सहली या शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाशी अनुसरून सहलीतून ऐतिहासिक व भौगोलिक ठिकाणांना भेटी दिल्या जाव्यात. सहलीला जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा रक्तगट माहिती असावा. गरज पडल्यास त्याला तत्काळ रक्त पुरवठा केला जाईल, असा त्यामागील हेतू असतो. दुर्दैवी घटना घडल्यास त्या मुलाला मदत मिळावी या हेतूने प्रत्येक विद्यार्थ्याचा विमा उतरविण्याची जबाबदारी संबंधित शाळेचीच असणार आहे. पहिली ते तिसरीतील मुलांच्या वयानुसार सहलीचे अंतर ठरलेले आहे. लहान मुलांची सहल एका दिवसाची असावी, असा देखील निकष आहे. शक्यतो शैक्षणिक सहली परिवहन विभागाच्या एसटी बसमधूनच जाव्यात, अशी अपेक्षा असते. खासगी वाहनातून सहली जाताना त्या वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र आहे का, आरटीओने त्याला एनओसी दिली आहे का, या बाबीदेखील पाहणे बंधनकारक आहे. ठरलेल्या निकषांची पूर्तता करणे शाळांसाठी बंधनकारक आहे.
खासगी वाहनांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसचे भाडे खूप कमी असते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीवेळी भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. प्रतिकिलोमीटर ५५ रुपयांचा दर असतो, पण शाळांना त्यातील केवळ ५० टक्के (प्रतिकिलोमीटर २८ रुपये) भरावे लागतात. दिवसभरात ३०० किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. विशेष बाब म्हणजे, प्रत्येक प्रवाशावर एक रुपयात दहा लाख रुपयांचा विमा उतरवला जातो. सर्वसामान्यांच्या लालपरीतून सुरक्षित प्रवास होतो म्हणून अनेक शाळा एसटीतूनच सहलीला जातात.
शाळांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल काढण्यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक आहे. सहली ऐतिहासिक व भौगोलिक असाव्यात. खोल समुद्रात, उंच पहाडावर लहान मुलांना नेऊ नये. (Consent and insurance required for school trips) प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांची समंती आणि मुलांचा विमा उतरवणे संबंधित शाळेला बंधनकारक असल्याची माहिती सोलापूर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा