जागर न्यूज : वाहतुकीच्या नियामानाबत आता अधिक दक्ष राहावे लागणार असून एक हजारापासून पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, वाढते अपघात रोखण्यासाठी ३१ मे पर्यंत मोहीम राबवली जाणार आहे.
अपघातांचे प्रमाण सतत वाढत असले तरी वाहनचालक अत्यंत बेफिकीर दिसून येतात आणि वाहतुकीच्या नियमांकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करतात. वाहन चालकांच्या या बेपर्वाईमुळेच अनेक अपघात होत असून कित्येकांचे प्राण या अपघातात जात आहेत. वाहतुकीला राज्यात शिस्त नसून शहरात आणि बाहेरील रस्त्यावर देखील वाहतुकीच्या नियमांना हरताळ फासला जात आहे परंतु आता बेशिस्त चालकांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत, कोणाचाही त्यात बळी जाणार नाही, यासाठी शहर वाहतूक पोलिस व आरटीओच्या माध्यमातून ३१ मेपर्यंत बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. सर्व वाहनचालकांना आता नियम पाळावेच लागणार आहेत; अन्यथा एक हजार ते २५ हजारांपर्यंत दंड भरावा लागणार आहे.
राज्यात दररोज ३७ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. सोलापूरसह पुणे, नगर, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, सांगली, नाशिक, अमरावती, बीड, जालना, रत्नागिरी व जळगाव या १४ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यूची नोंद महामार्ग पोलिसांत झाली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबरअखेर तब्बल ११ हजार ६४९ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. राज्यभर महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढली असून वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. चिंता वाढवणारी बाब म्हणजे, मागील पावणेपाच वर्षांत राज्यातील विविध महामार्गांवरील अपघातात ६२ हजार ७९५ जणांनी जीव गमावला आहे.
नाशिक जिल्ह्यात यावर्षी सर्वाधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात साडेआठशे जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नगर या प्रत्येक जिल्ह्यातील मृतांची संख्यादेखील पाचशेहून अधिक आहे. जळगाव, नागपूर, बीड या जिल्ह्यांत मागील दहा महिन्यांत बाराशे जणांना जीव गमवावा लागला आहे. (Violation of traffic rules will result in a fine of twenty five thousand) २०१८ च्या तुलनेत यंदा अपघात व मृत्यू वाढल्याचेही महामार्ग पोलिसांनी सांगितले. त्याचे प्रमुख कारण वाहतूक नियमांचे उल्लंघन हेच राहिले आहे. त्यामुळे आता विशेष मोहिमांच्या माध्यमातून देखील कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई टाळायची असेल तर वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा