जागर न्यूज: रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे अनेकदा नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करतात पण लाडक्या मांजराच्या मृत्यूमुळे देखील महिलेने काही जणांना सोबत घेत डॉक्टरना बेदम मारहाण केल्याची एक घटना पुण्यात घडली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण मृत्युमुखी पडला तर नातेवाईक डॉक्टरांविरुद्ध संतापतात आणि अनेक आरोप करीत डॉक्टरांना दोष देतात. कित्येकदा तर डॉक्टरांची धुलाई देखील केली जाते. पुण्यातून मात्र वेगळीच बातमी समोर आली असून आपले लाडके मांजर मेल्यामुळे संतापलेल्या एका महिलेने चौघांना सोबत घेतले आणि डॉक्टरांना बेदम मारले. या मारहाणीत डॉक्टर जखमी झाले आहेत. या मारहाणीचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबधित महिला पुण्यातील एका पाळीव प्राण्यांवर उपचार करणार्या रुग्णालयात आपल्या मांजराला उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारादरम्यान तिच्या मांजराचा मृत्यू झाला. मांजराचा मृत्यू झाल्याने या महिलेसह चार अनोळखी व्यक्तींनी डॉक्टरांना मारहाण करत क्लिनिकची तोडफोड केली.
हडपसर येथील भाजी मंडई जवळील डॉग अॅण्ड कॅट क्लिनिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी डॉ.रामनाथ येण्याबापु ढगे (वय-५१,रा.हडपसर,पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एक महिला आणि चार अनोळखी इसम यांचे विरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१० डिसेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला आहे. तक्रारदार यांचे हडपसर भागातील डॉग अॅण्ड कॅट क्लिनिक येथे क्लिनीक आहे. येथे एका मांजराचा मृत्यू झाला आणि हे प्रकरण डॉक्टरांच्या भलतेच अंगलट आले.
आरोपींनी उपचारसाठी आणलेल्या मांजराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आरोपींनी डॉक्टरांना शिवीगाळ करुन मांजर कसे झोपले आता तुला झोपवतो, तुझा दवाखाना बंद करतो अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरांचा पाय फ्रॅक्चर झाला. तसेच डॉक्टरांच्या क्लिनिकमधील वस्तूंची तोडफोड करुन आरोपी पसार झाले. (The doctor was brutally beaten as the cat died) या घटनेचे चित्रिकरण क्लिनिकमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून त्याआधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलीस करत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा