जागर न्यूज : भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघाताबाबत त्यांच्या वडिलांनीच शंका उपस्थित केली असल्याने राजकारणात आणखी खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार गोरे यांचा काल फलटण येथे जीवघेणा अपघात झाला आणि सुदैवाने ते यातून बचावले आहेत. सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज, शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. सध्या आमदार जयकुमार गोरे यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, आमदार गोरे यांच्या अपघातावरून त्यांचे वडील भगवान गोरे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. त्यामुळे आमदार गोरे यांच्या वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे
आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात झाल्यानंतर त्यांचे वडील भगवान गोरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर भगवान गोरे यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भगवान गोरे म्हणाले, 'माझं जयकुमार गोरे यांच्याशी बोलणं झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखं कारण नाही. मला अपघात झाल्यानंतर बीपीचा त्रास असल्यामुळे मला कळविले नाही. (MLA Jayakumar Gore doubts about the accident) अपघात घडल्यानंतर मला फलटणवरून कॉल आला. त्यानंतर जोडीदारासोबत रुग्णालयात आलो' असे भगवान गोरे म्हणाले.
अपघातावेळी नेमका काय झालं हे 'वरच्या' लाच माहीत असेल. पण रस्त्यावर ट्रॅफिक नसताना अपघात झाला. त्यामुळे या अपघाताबाबत मला शंका वाटत आहे. अपघातास्थळी मी गेलो होतो. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही, असा संशय भगवान गोरे यांनी व्यक्त केला आहे. "मला आमदार गोरे यांनी मला तब्येत ठीक असून आपण घरी जावा सांगितलं. मला वाटतं ते बोललो. फलटणमध्येच सातत्याने अपघात घडत आहे. त्यामुळे मला शंका वाटत आहे. मी कोणावर संशय घेऊ शकत नाही", असेही त्यांनी सांगितले.
आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातामुळे कालपासून चिंता व्यक्त होत असतानाच त्यांच्या वडिलांनी उपस्थित केलेल्या या शंकेमुळे हा अपघात आहे की घातपात आहे ? असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आ. गोरे यांच्या वडिलांनीच ही शंका उपस्थित केल्यामुळे याला अधिक महत्व आहे परंतु त्यांनी थेट संशय व्यक्त केला नाही. असे असले तरी देखील त्यांच्या मनात आलेली शंका गंभीर मानली जात असून आता त्यादृष्टीने तपास होणार की नाही हे पाहावे लागणार आहे. राजकीय वर्तुळात मात्र या शंकेने चर्चा आणि खळबळ असून कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
आ . गोरे यांचा अपघात हा अपघातच असून तो अन्य कसला प्रकार नसण्याची शक्यता असल्याचे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. बोलण्याच्या ओघात त्यांचे वडील बोलून गेले असतील परंतु तसा काही प्रकार असण्याची शक्यता देसाई यांनी फेटाळली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा