जागर न्यूज : कॉरिडॉरचा विषय पंढरपुरात धगधगता असतानाच आणि स्थानिकांचा प्रखर विरोध असताना अनेकदा वादग्रस्त ठरलेले कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी मात्र स्थानिकांची शिकवण सुरु केली आहे.
पंढरपूर विकासाच्या प्रत्येकवेळी स्थानिकांची घरे, दुकाने यांची जागा गेली आहे, स्थानिक असूनही विस्थापित होण्याची वेळ एकदा नव्हे तर पुन्हा पुन्हा आली आहे. आता पुन्हा विकासाच्या नावाने स्थानिकांच्या घरादारावर आणि पोटापाण्याच्या व्यवसायावर नांगर फिरण्याचे नियोजन सुरु झाले आहे. साखरेचा मुलामा देत कडू गोळी घशाखाली उतरविण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु झाला आहे. स्थानिक नागरिकांनी हा खेळ ओळखला असून त्याला जोरदार विरोध होऊ लागला आहे. पंढरपूर हे संताचा कायम आदर करीत आलेले आहे. स्थानिकावर संकट येऊ लागले असताना मात्र स्थानिकांना विरोध करण्याची भूमिका एका कीर्तनकाराने घेतली आहे. साधू संत, कीर्तनकार ही मंडळी राजकारणापासून कायम दूर असतात पण कीर्तनकार कराडकर हे मात्र कायम राजकीय वादात गुरफटलेले असतात आणि त्यांनी आता पुन्हा स्थानिक प्रश्नात डोकावून स्थानिकांनाच दुखावण्याचा प्रयत्न केला आहे.
वाराणसी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर व विठ्ठल मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला आहे. या विकास आराखड्याला स्थानिक व्यापारी आणि रहिवाशांनी विरोध केला आहे. मात्र, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे लाखो भाविकांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशांनी विकास आराखड्याला विरोध करू नये, असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
पंढरपूरच्या विकासात भर घालणारा प्रस्तावित कॉरिडॉर तयार करण्यासाठी राज्य सरकारने सुमारे दीड हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे सुचविली आहेत. मंदिर परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी कॉरिडॉरला विरोध सुरू केला आहे. या संदर्भात सर्वपक्षीय समिती देखील स्थापन केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत ठोस असे काही आश्वासन न मिळाल्याने सर्वपक्षीय समितीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. बंडातात्या कराडकर यांच्या भूमिकेने मात्र स्थानिकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.
ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या कॉरिडॉरचे स्वागत केले आहे. बंडातात्या कराडकर म्हणाले की, विकास आराखड्यामध्ये बाधित होणाऱ्या स्थानिक व्यापारी व रहिवाशांना राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत देऊन त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे. परंतु विकास कामाला व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी विरोध न करता आपल्या भावनांना मुरड घालावी, असे आवाहन कराडकर यांनी केले आहे. (Bandatatya Karadkar hurt the sentiments of Pandharpur)आता यावर स्थानिक प्रतिक्रिया कशा पद्धतीने उमटतात हे पहावे लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा