जागर न्यूज : सापाचा दंश करण्याची धमकी देत एका व्यावसायिकाला लुटण्याची अजब घटना समोर आली असून लुटण्याचा हा नवा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे.
पैशासाठी कुणी काहींही करतो हे गेल्या काही काळात सतत समोर येत आहे. कुणी चोरी करतो तर कुणी फसवणूक करतो, कुणी काही भीती घालून पैसे उकळतो तर कुणी ऑनलाईन गंडा घालत असतो. पुण्यात मात्र एक वेगळा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकास पळवून नेऊन सापाचा दंश करण्याची धमकी देत त्याला लुटण्याचा अजब प्रकार समोर आला आहे. लाेणी काळभाेर परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाच्या ओळखीतील काही जणांनी अपहरण करून त्यास साप आणून ताे चावण्याची धमकी देऊन लुटल्याचा प्रकार घडला आहे. भामटयांनी गुगल पेद्वारे २५ हजार रुपये घेऊन त्याची साेन्याची चेन काढून घेत बेदम मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्यात मुंढवा येथील नीरजकुमार जितेंद्रकुमार सिंग या व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे. अपेक्षित अनिल नावंदार, रणजित, अमरदीप व एक अनाेळखी यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीरजकुमार यांच्या तक्रारीनुसार सदरची घटना १८ ऑक्टाेबर राेजी घडल्याची माहिती पाेलिसांनी शनिवारी दिली आहे. तक्रारदार नीरजकुमार सिंग हे फार्मा फाेर्ट या कंपनीत औषध सेल्स व पर्चेसचे काम करतात. आराेपी हे त्यांच्या ओळखीचे असून त्यांनी तक्रारदाराकडून गाेदाम भाड्याने घेतले होते, हे गाेदाम खाली केल्यानंतर तक्रारदाराने गाेदामाचे भाडे मागितले हाेते. परंतु आराेपींनी भाड्याचे पैसे न देता तक्रारदाराला गाेड बाेलून चहा घेऊया, असे बाेलून इतर आराेपींसाेबत चारचाकी गाडीतून पळवून नेले.
अपहरण करून त्यांना वडकी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने माेकळ्या मैदानात आणून शिवीगाळ करून पैशाच्या कारणावरून तसेच तक्रारदाराच्या ओळखीचे हितेश व स्वामी यांना बाेलवण्यास सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊन देताे तसेच साप आणून डसवण्याची धमकी देऊन तक्रारदाराच्या गुगल पे अकाउंटवरून २५ हजार रुपये घेऊन त्यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील साेन्याची चेन काढून घेण्यात आली. याप्रकरणी लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक गाेरे पुढील तपास करत आहेत. लुटण्याचा हा दुर्मिळ प्रकार असून नागरिकातून देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा