जागर न्यूज : नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बस सोडण्याचे नियोजन केले असून दररोज पन्नास एस टी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नवरात्र आणि दसरा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. असंख्य भाविक तुळजापूर येथे जाऊन आई तुळजाभवानीचे दर्शन घेत असतात. पायी जाणाऱ्यांची संख्याही मोठी असते शिवाय विविध वाहनातून देखील भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी जात असतात. त्यांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. शारदीय नवरात्र महोत्सवानंतर कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. दर्शनानंतर गावाकडे परतणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागातून ७ ते ११ ऑक्टोबर दरम्यान ४५० एसटी बस धावणार असल्यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
उद्या सोमवारपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने सोलापूर विभागातून दररोज ५० गाड्यांचे नियोजन केले आहे. तर ७ ते ११ ऑक्टोबरदरम्यान कोजागरी पौर्णिमेसाठी ४५० बसची सोय केली आहे. महामंडळाने तुळजापूर येथील नवीन बसस्थानकावरून वाहतुकीचे नियोजन केले आहे.सोलापूर- तुळजापूर, तुळजापूर- बार्शी दरम्यान जवळपास १६० बस तर इतर मार्गांवर २९० बस सोडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कोजागरी पौर्णिमेसाठी तुळजापुरातील नवीन बसस्थानकातून बसची सोय करण्यात आली आहे. महामंडळातर्फे कर्नाटक, लातूर, सोलापूर यासह विविध मार्गांवर कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. (Additional ST bus arrangement for Tuljabhavani Darshan) राज्य परिवहन महामंडळाच्या या सुविधेमुळे तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा