मुंबई : राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे आजचे निकाल पाहिले असता राज्यात राष्ट्रवादीच नंबर एकचा पक्ष असल्याचे सिद्ध होत आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आज घोषित झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात कमालीचा उत्साह संचारला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काय चित्र दिसेल त्याचेच हे संकेत मानले जात आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रमे हाती घेतली होती. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने सोडवण्याचा प्रयत्न केला होता त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाल्याचं जयंत पाटील म्हणाले.
या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे. असे सांगतानाच पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या, पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना सर्व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
भाजपला नाकारले !
राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या याचा अर्थ भाजपला जनतेने स्पष्टपणे नाकारले आहे असे राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांनी म्हटले आहे. निकालानंतर मलिक यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे राज्यात झालेल्या नगरपंचायत निवडणूकीत जनतेचा कल राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजुने दिसत आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी स्वबळावर लढली आहे तर काही ठिकाणी सेनेबरोबर तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत असे असताना मतांचे विभाजन होऊनही जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात आपला कौल टाकला असल्याचंही मलिक म्हणाले.
राज्यातील आजच्या निकालाने राष्ट्रवादीचा उत्साह प्रचंड वाढला असून शिवसेनेला मात्र अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. राज्यात सत्ता असताना आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असताना शिवाय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे लोकप्रिय होत असताना शिवसेनेच्या पदरी काही पडताना दिसत नाही. शिवसेनेने प्रत्यके जिल्ह्यात आढावा घेत नुसतेच मिरवणारे पदाधिकारी बदलण्याची वेळ आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा