वर्धा : जिल्ह्यातील आर्वी येथे एक खळबळजनक प्रकरण समोर आले असून गॅस चेंबरमध्ये चक्क ११ कवट्या आणि हाडांचे अवशेष आढळून आल्याने वर्धा जिल्हा हादरला आहे.
अल्पवयीन मुलीच्या बेकायदेशीर गर्भपात करण्याचे एक प्रकरण नुकतेच उजेडात आले होते पण या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याच्या प्रकरणी डॉक्टर रेखा कदम हिला पोलिसांनी अटक केले होते. गर्भपात प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. दरम्यान उप जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता वेगळेच आणि भयानक वास्तव समोर आले आणि जिल्ह्याला मोठा हादरा बसला आहे.
डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागील बाजूस पोलिसांनी तपासणी केली तेंव्हा मागच्या बाजूस गोबरगॅस चेंबरच्या आत भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष आढळून आले. हा प्रकार पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. रुग्णालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या गोबरगॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे ११ कवटी सदृश्य अवयव आणि इतर ५६ अवयव पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे एकूण प्रकरण एका अल्पवयीन मुलीच्या गर्भपातापर्यंत मर्यादित नाही हे उघड झाले आहे.
जादा रक्कम घेऊन एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची तक्रार दोन दिवसापूर्वीच पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांनी मुलीसह तिच्या आई वडिलांना देखील ताब्यात घेतले होते. रुग्णालयातील डॉक्टर रेखा कदम यांनाही पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांच्या तपासात गोबरगॅसमध्ये लहान हाडांचा सांगाडा सापडल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर रेखा कदम याना अटक केली होती. गॅस चेंबरच्या आत सापडलेल्या कवट्या आणि हाडे वैद्यकीय तपासणीसाठी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. एक महिला डॉक्टर चालवीत असलेल्या रुग्णालयातील या प्रकाराने जिल्ह्याला मात्र मोठा हादरा बसला आहे.
खालील महत्वाच्या बातम्या चुकवू नका !
त्यासाठी खालील शीर्षकावर क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा