मुंबई : लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापल्याने विरोधकांनी सवाल उपस्थित केला होता पण आता पाच राज्यात लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसणार नाही.
पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत असताना प्रत्येक पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वादाचे ठरले होते. विरोधकांनी सातत्याने या छायाचित्रावर टीका केलीच होती पण त्यानंतर लसीकरण प्रमाणपत्रावर मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले. या छायाचित्रावर अनेकांनी टीका केली आणि लसीकरण झाल्याच्या प्रमाणपत्रावर हा फोटो कशासाठी ? असा सवालही उपस्थित केला होता. कोरोनाची लस घेतल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते पण या प्रमाणपत्रावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र दिसते. या छायाचित्रावरून बराच गदारोळही झाला होता. पण आता लसीकरण केले तरी या प्रमाणपत्रावर हा फोटो दिसणार नाही.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, आणि गोवा राज्यातील विधानसभा निवडणुका घोषित करण्यात आल्या आहेत आणि या पाच राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून आता या राज्यात लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असणार नाही. प्राप्त माहितीनुसार लस प्रमाणपत्रावरून हा फोटो हटविण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर फिल्टर टाकला जाणार आहे. पाच राज्यातील निवडणुका १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालखंडात होणार आहेत आणि १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो लावता येणार नाही.
विरोधकांनी आक्षेप घेतला तरी हे छायाचित्र हटविले गेले नाही पण मार्च २०२१ मध्ये काही राजकीय पक्षांच्या तक्रारी आल्यानंतर आरोग्य मंत्रालयाने निवडणूक आयोगाच्या सूचनेवर आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल. पुद्दुचेरी या राज्यातील निवडणुकांच्या वेळी हे पाऊल उचलले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा