जागर न्यूज : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी, सोलापूर जिल्ह्यात तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरवात होणार असून मोठमोठ्या मंडळांनी गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात येणार आहे. यंदा बाराशे होमगार्डसह एकूण तीन हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.सोलापूर जिल्ह्यातील जवळपास तीनशेहून अधिक गावात ‘एक गाव एक गणपती’ बसविण्याचा निर्णय झाला आहे.
सार्वजनिक मिरवणुकांचा खर्च टाळून गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य कायम ठेवून तरुणांनी शांततेत व आनंदात उत्सव साजरा करावा. वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये, मिरवणुकीसाठी लावल्या जाणाऱ्या वाहनांना आरटीओचा परवाना आवश्यक आहे, वीज कनेक्शन देखील अधिकृत असावे, अशा पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या आवाजाचे वाद्य लावून ध्वनी प्रदूषण न करता पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.गणेशोत्सवानिमित्त काही गावांमध्ये आगमन व विसर्जन मिरवणूक काढली जाते. त्यावेळी कोणीही सोशल मीडियावरील अफवांना दाद देऊ नये. आक्षेपार्ह मेसेज किंवा व्हिडिओ खात्री न करता व्हायरल करू नये, अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. (Tight security in Solapur district for Ganeshotsav) त्यामुळे अशावेळी संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधून गणेशोत्सव आनंदात साजरा करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
मुस्लिम बांधवांनी गणेशोत्सवामुळे ईद-ए-मिलादची मिरवणूक २८ सप्टेंबरऐवजी धार्मिक सलोखा राखत २९ व ३० सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी धार्मिक सलोखा राखण्यासाठी योगदान दिले, त्यांचा प्रत्येक पोलिस ठाण्याअंतर्गत सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा