जागर न्यूज : एस टी बसचा पुन्हा एकदा मोठा अपघात झाला असून प्रवाशांना घेवून जात असलेली एसटी पुलावरून ओढ्यात कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे.
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगावमध्ये एसटी बसला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने ही एसटी बस जात होती. एसटी बस पुलावरुन थेट ओढ्यामध्ये कोसळली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तर दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. घटनास्थळी स्थानिक गावकरी आणि पोलिसांनी धाव घेतली असून बचावकार्य सुरु करण्यात आले. अलीकडे सातत्याने एस टी अपघात होताना दिसत असून सुरक्षित प्रवास देण्याची हमी आता केवळ कागदावरच उरली असल्याचे दिसत आहे.
कल्याणवरुन भीमाशंकरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसला सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील गिरवली येथे ही घटना घडली. गिरवली येथील स्मशानभूमीजवळ असणाऱ्या ओढ्यावरील पुलावरून ही एसटी बस २० फूट खोल ओढ्यात कोसळली. या एसटी बसमधून ३५ प्रवासी प्रवास करत होते. यामधील दोन जण जखमी झाले आहेत तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. इतर सर्व प्रवासी सुखरुप आहेत. अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळावर रुग्णवाहिका दाखल झाल्या असून जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा