जागर न्यूज : चार चाकी वाहनातून विनापरवाना चालवलेली गोवा बनावटीची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडली असून कारसह पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोवा राज्यातून महाराष्ट्रात मद्य आणण्यास कायद्याने बंदी आहे परंतु गोवा राज्यात दारू स्वस्त असल्यामुळे चोरट्या मार्गाने ती महाराष्ट्रात आणली जाते. महाराष्ट्रात तिची विक्री करून कमाई केली जाते. अशा दारूवर उत्पादन शुल्क विभागाची नजर असते आणि त्यांच्या नजरेत आलेल्या एका कारमधून गोवा बनावटीची चोरटी दारू आढळून आली. गोवानिर्मित विदेशी दारूचे ३० बॉक्स चारचाकी कारमधून वाहतूक करणाऱ्या तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने माचणूरजवळ सांगोला-मंगळवेढा रोडवर पकडले. पहाटेच्या सुमारास विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. मुंबई पासिंग असलेल्या एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचे बॉक्स नेले जात असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक कदम यांच्या पथकाने पहाटे पाच-साडेपाचच्या सुमारास माचणूर गावाच्या हद्दीत सापळा रचला. काहीवेळाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला समोरून एक कार (एमएच ०२, सीएल ०८११) येताना दिसली. त्याला अडवून पोलिसांनी वाहनचालक लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. कारसह पावणेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम, सांगोल्याचे दुय्यम निरीक्षक कैलास छत्रे, जवान तानाजी काळे, तानाजी जाधव, वाहनचालक संजय नवले यांच्या पथकाने पार पाडली.जिल्ह्यातील अवैध हातभट्टी व मद्यविक्री बंद व्हावी, यासाठी शहर-ग्रामीण पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून राज्य उत्पादन शुल्क विभाग रात्रंदिवस काम करीत आहे.
रस्त्याने दारूची वाहतूक होत असल्यास किंवा कुठेही हातभट्टी दारू तयार केली जात असल्यास नागरिकांनी थेट १८००२३३९९९९ व व्हॉट्सअपॅ क्रमांक ८४२२००११३३ यावर संपर्क साधावा. (Goa-made liquor seized during Sangola-Mangalvedha)तसेच गावातील हातभट्टी विक्रीसंदर्भात देखील नागरिक तक्रार करू शकतात, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा