जागर न्यूज : पहिली बायको असूनही तिच्या परस्पर दुसरे आणि अल्पवयीन मुलीशी लग्न केल्याचे नवर्याचे भांडे फुटले आणि दोन लग्न करणाऱ्या नवरदेवाची वरात पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना मंगळवेढा तालुक्यात घडली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील अंगणवाडी सेविका असलेल्या नंदा शंकर उन्हाळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून या घटनेने मंगळवेढा तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. मोहोळ तालुक्यातील काळवाडी येथील ज्योतीचे निंबोणी येथील अशोक यशवंत माळवे याच्यासोबत लग्न झाले होते परंतु त्याने पहिली पत्नी असताना कचरेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीशी लग्न केले. हा सगळा प्रकार गुपचूप करण्यात आला पण या लग्नाच्या फोटोने सगळे पितळ उघडे पडले आणि प्रकरण थेट पोलीस ठाण्यात गेले. दुसऱ्या लग्नाचे फोटो मोबाईलवर ठेवले आणि ते पहिल्या पत्नीच्या पाहण्यात आले.
पहिली पत्नी असून तिच्या परस्पर केलेल्या दुसऱ्या लग्नाचे फोटो मोबाईलवर ठेवल्याचे पहिल्या पत्नीने पोलिसात दाखवले त्यानंतर या घटनेची वस्तुस्थिती पाहण्यासाठी पोलीस पाटील पांडुरंग खडतरे, सरपंच संगीता काळुंगे,कचरेवाडी तलाठी दीपा पवार यांना डोंगरगाव येथे पाठवले. त्यांनी येथे मुलीच्या घरी विचारणा केली असता सदरचे लग्न झाल्याचे सांगितले सदर मुलीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा खवे येथे झाले असून या शाळेतील शाळा सोडल्याचा दाखला ताब्यात घेऊन त्यावर वय पाहिले असता सदर मुलीचे वय सोळा वर्षे तीन महिने असल्याचे दिसून आले व त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीचा पती अशोक यशवंत माळवे रा.निंबोणी याला विचारले असता त्याने उषा दत्ता भोसले राहणार डोंगरगाव हिच्या बरोबर लग्न झाल्याची कबुली दिली.
सदर लग्नासाठी गोमाबाई शंकर शिंदे राधा यशवंत शिंदे कृष्णा यशवंत माळवे हे सर्वजण रा.निंबोणी ता. मंगळवेढा, दत्ता धोंडीराम भोसले शारदा दत्ता भोसले रा. कचरेवाडी व इतर अनोळखी दोन ते तीन इसम असल्याचे सांगितले यावरून या सर्वा विरोधात मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील लग्न लावून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. पती व त्याच्या भावास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली. एक पत्नी असताना गुपचूप दुसरे लग्न उरकले आणि तेही अल्पवयीन मुलीच्या सोबत लग्न केले त्यामुळे नवरोबा कायद्याच्या कचाट्यात चांगलाच अडकला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा