सोलापूर : कोरोना आणि ओमिक्रोन चे रुग्ण वेगाने वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील पावणे सहा लाख लोकांना अधिक धोका असल्याचे स्पष्ट होत आहे.
कोरोणाचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने मोफत लस दिली असून लसीकरण करून घेण्याबाबत सतत जनजागरण करण्यात येत आहे पण अजूनही लस न घेणाऱ्यांची संख्या अधिकच आहे, यात सोलापूर जिल्ह्यातील संख्या पाच लाखाहून अधिक व्यक्तींनी लस घेतलेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढू लागला असून यावेळी सर्वाधिक धोका कोरोना प्रतिबंधात्मक लस न घेतलेल्या व्यक्तींना आहे. सोलापूर जीळाय्त ५ लाख ७३ हजार ३८६ व्यक्तींनी कोरोना लसीचा पहिला डोस देखील अजून घेतलेला नाही. यात सोलापूर शहरातील १ लाख १२ हजार तर ग्रामीण भागातील ५ लाख व्यक्तींचा समावेश आहे. पहिला डोस घेतला आहे पण दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाहीत असे अडीच लाख लोक सोलापूर जिल्ह्यात आहेत. लस न घेतलेल्यांनाच कोरोना आणि ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असून त्यांच्यात विषाणूची तीव्रता अधिक असल्याची चिंता सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाच्या रुग्णात मोठी भर पडत आहेच पण हा वेग पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या कितीतरी पट अधिक आहे. शासनाने आता एकेक निर्बंध लागू करण्यास प्रारंभ केला असून राज्यात आणखी कडक निर्बंध लागू केले जाणार आहेत. हे निर्बंध एक दोन दिवसात लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे .तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली असून ओमिक्रॉनचा संसर्गही वाढू लागला आहे. मुंबई, पुण्यातील शाळा बंदचा निर्णय यापूर्वीच झाला असून राज्यात काही प्रमाणात निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. तरीही, संसर्ग कमी झाला नसून सध्या बाधित होणाऱ्यांमध्ये लस न टोचलेलेच सर्वाधिक आहेत. त्यांच्यातील विषाणूची तीव्रताही अधिक जाणवू लागली आहे. दोन्ही डोस टोचलेल्यांना केवळ साधा ताप, सर्दी, खोकला असल्याची बाब समोर आली आहे. तरीही, राज्यातील तब्बल एक कोटी व्यक्ती पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोससाठी आलेच नाहीत. दुसरीकडे १५ ते १८ वयोगटातील ६० लाख मुलांना कोवॅक्सिन लस टोचणे अपेक्षित असून त्यात सोलापूर शहर-ग्रामीणमधील अडीच लाख मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत दहा हजार मुलांनीदेखील लस टोचलेली नाही. दरम्यान, ज्या व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले, त्यांनी त्याच लसीचा बुस्टर डोस घ्यावा, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
२५ डिसेंबर पासून राज्यात रोज मोठ्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत आणि ही वाढ रोज चढत्या आलेखाने होते आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन अधिक अलर्ट झाले असून येत्या काही दिवसात वेगवेगळ्या निर्बंधाना सामोरे जावे लागणार आहे. राज्यात कोरोनाचे दररोज सरासरी ३२ हजारांवर रुग्ण आढळू लागले आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आता संसर्ग वाढत असल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली आहे. राज्यस्तरावर शाळा बंदचा निर्णय होईल, याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. परंतु, स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कालच निर्बंधाबाबत स्पष्ट संकेत दिलेले असून सोलापूर जिल्ह्यातील निर्णय सोमवारी सायंकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा