जागर न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि आमदार राम सातपुते यांच्यावर पक्षानं मोठी जबाबदारी दिली आहे. थेट मध्य प्रदेशचीच धुरा आता त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मध्यप्रदेश अमरवाडा (जिल्हा छिंदवाडा) आणि केवलारी (जिल्हा सिवनी) या दोन मतदारसंघात मतदारांचा कानोसा घेणे, पक्ष संघटन मजबूत करणे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची तळागाळापर्यंत माहिती देणे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वरील दोन्ही उमेदवार निवडून आणणे अशी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलीये. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा आणि प्रदेश पातळीवर अध्यक्ष म्हणून महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. (MLA from Solapur, responsibility of Madhya Pradesh) प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी राज्यात किमान सात ते आठ वेळा प्रत्येक विधानसभा मतदारसंघापर्यंत दौरा करून पक्ष वाढविण्यास मोठी मदत केली होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तसेच आमदार राम सातपुते यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दांडगा अनुभव आहे. संघटन कौशल्य, वक्तृत्व आणि समोरच्या माणसांचे मन जिंकणे यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे दोघांनाही भाजपच्या केंद्रीय स्तरावरून महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. यापूर्वीही गोवा येथे दोघांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली होती, त्यात त्यांना यश आले होते. यावेळीही अमरवाडा मतदारसंघ रणजितसिंह यांना व केवलारी मतदारसंघ सातपुते यांना पक्षाने संघटनात्मक बांधणीसाठी दिलेला आहे. महाराष्ट्रातून जाऊन मध्य प्रदेशात या आमदारांचा किती प्रभाव पडू शकतो याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा