जागर न्यूज : लाडक्या लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकताच पित्याने प्राण सोडल्याही एक हृदयद्रावक घटना समोर आली असून यामुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
कुठल्याही पित्यावर मुलापेक्षा मुलगीच अधिक प्रेम करीत असते असे म्हणतात, पित्याचेही मुलापेक्षा मुलीवर अधिक प्रेम असते आणि तिच्यासाठी पित्याच्या काळजाला नेहमीच पीळ पडत असतो. मुलीचा चेहरा सुकलेला दिसला तरी बापाचे काळीज गलबलून येत असते. अशा या जीवाच्या नात्याचा आणखी एक अनुभव समोर आला असून आपली लाडकी मुलगी या जगात राहिली नाही हे ऐकून पित्यानेही जगाचा निरोप घेतला आहे. एकुलत्या एक विवाहित लाडक्या लेकीच्या मृत्यूची खबर ऐकताक्षणीच बापानेही इहलोकीचा निरोप घेतला. बाप आणि लेकीवर काळाने अवेळी घातलेली ही झडप राशीनसह परिसरातील लोकांच्या जिवाला चटका लावून गेली.बाप आणि लेकीच्या जाण्याने नातेवाइकांनी फोडलेला टाहो आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या आक्रंदनात अवघी देशमुखवाडी शोकसागरात बुडाली. ही घटना शुक्रवारी घडली.
अंगणवाडी सेविका असलेल्या मीनाक्षी सोमनाथ पवार (वय ३४, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती, जि. पुणे) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. याची खबर त्यांचे वडील भागवत विष्णू दंडे (वय ६५, रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) यांना समजता क्षणी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.बाप-लेकीचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने राशीनसह परिसरात हळहळ करीत चर्चा सुरू होती. मीनाक्षीच्या मागे पती, दोन मुले आणि सासू-सासरे, तर दंडे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून आणि नातवंडे, असा परिवार आहे. (The father died after hearing about the death of the daughter) दंडे हे पैलवान असल्याने राशीनमध्ये वस्ताद नावाने सुपरिचित होते. मीनाक्षीवर डोर्लेवाडी येथे, तर दंडे यांच्यावर देशमुखवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बाप लेकीच्या प्रेमाचा हा धक्कादायक शेवट झाला आणि परिसरातील लोकांच्या मनाला चटका लावून गेला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा