जागर न्यूज: शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यात शिंदे गटाला मोठी चपराक दिली असून शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात रोज काहीजण प्रवेश करीत आहेत, शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करीत राज्यात सत्ता स्थापन केली आणि तेंव्हापासून शिवसेनेला (उद्धव ठाकरे) राज्यात ओहोटी लागल्याचे चित्र दिसत आहे. अजूनही अनेकजण शिंदे गटात दाखल होत असतानाच सोलापूर जिल्ह्यात मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. वाजत गाजत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले पदाधिकारी पुन्हा परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी विशेषत: संभाजीनगर येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे शिवसेनेत दाखल झाले असतानाच सोलापूर जिल्ह्यातही 'घरवापसी' सुरु झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील शिंदे गटातील तसेच भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातील पदाधिकारी परत ठाकरे शिवसेनेत दाखल झाले आहेत, शिवाय त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत. शिंदे गटातील जिल्हा उपप्रमुखासह भारतीय जनता पक्ष, मनसे या पक्षातील पदाधिकारी यांनी ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला असून उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांनी आपली राजकीय खेळी यशस्वी करीत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. (Back home from Shinde group to Thackeray group) शिंदे गटातील (बाळासाहेबांची शिवसेना) सोलापूर उप जिल्हाप्रमुख मनोज पवार यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह पुन्हा शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता ते परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत परतले आहेत.
शिंदे गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह मनसे, भारतीय जनता पार्टीमधील २१ जण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. हा प्रवेश करताना त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षातील अनेक पदाधिकारी हे केवळ सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. काही जण स्वत:ला एकनाथ शिंदे समजू लागले असून ठाकरे गटातून गेलेल्या अनेक पदाधिकाऱ्याना आपली पोळी भाजून घ्यायची आहे. या सगळ्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत. त्यांना अभय मिळावे यासाठी शिंदे गटात दाखल झाले आहेत. असा आरोप शिवसेनेत परत आलेले मनोज पवार यांनी केला आहे. हा शिंदे गट दोन वर्षे देखील टिकणार नसून सगळ्यांची माती होणार आहे असेही पवार यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा