जागर न्यूज : आपल्याच अवघ्या पाच वर्षे वयाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याची क्रूर घटना मालाड येथे समोर आली असून या घटनेने अनेकांचा थरकाप उडाला आहे.
प्रत्येक पिता आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतो आणि त्याचे हवे ते लाड पुरविण्याचा प्रयत्न करीत असतो. मुलाला थोडीशी जखम झाली तरी बापाला वेदना होतात पण तोच बाप आपल्या कोवळ्या मुलाचा अत्यंत क्रूरपणे खून करू शकतो हे देखील आता समोर आले आहे. मुलगा झोपेत असतानाच घरातील चाकूने बापाने मुलाचा चिरून त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहेच पण बापाच्या या क्रूर कृत्याने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. अवघ्या पाच वर्षे वयाच्या मुलाने अजून व्यवस्थितपणे दुनिया पहिली अनुभवलीही नव्हती परंतु जन्म दिलेल्या बापानेच त्याच्या आयुष्याचा शेवट केला आहे.
अंड्यांचा व्यवसाय करणाऱ्या नंदन अधिकारी नावाच्या नराधम बापाने पत्नीसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून मुलाची हत्या केली. मालाड पश्चिम येथील मालवणी परिसरात ही धक्कदायक घटना घडली आहे. मालवणी पोलिसांनी आरोपी नंदनला ताब्यात घेतले आहे. तर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आरोपी पत्नी आणि दोन मुलांसह मालवणी परिसरात राहत होता.
आरोपीची पत्नी आपल्या तेरा वर्षाच्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली. मात्र, जेव्हा ती घरी आली तेव्हा तिला घराच्या फरशीवर मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती मालवणी पोलिसांना दिली. मुलाची हत्या केल्यानंतर नंदन स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबूली दिली. नंदनने आपल्या मुलाची इतक्या क्रूरतेने हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दोघा पती पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. (Murder of a minor by a cruel father) दरम्यान या प्रकरणी मालाडच्या मालवणी पोलिस ठाण्यात नंदन विरोधात ३०२ भादवी कलमांतर्गग गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा