सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून कोरोना आता हद्दपार होण्याच्या मार्गावर असून ग्रामीण भागात अकरा तर शहरात कोरोनाचे सहा रुग्ण शिल्लक आहेत. जिल्ह्यातील ९ तालुके कोरोनामुक्त झालेले आहेत.
कोरोना महामारीने जगणेच नव्हे तर मरणे देखील कठीण करून ठेवले होते. देशातील नव्हे तर जगातील परिस्थिती कोरोनामुळे अत्यंत बिकट झाली होती तर सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सण उत्सवावर पूर्ण बंधने होतीच पण रोजचे जगणे देखील या कोरोनाने कठीण करून ठेवले होते. धडधाकट असलेली जवळची माणसे गेली, व्यावयास, उद्योग ठप्प झाले होते आणि कित्येक वर्षे माणसाला या कोरोनाने मागे नेले आहे. पूर्वपदावर अजूनही येत आले नसून यासाठी आणखी बराच काळ जाणार आहे. अनपेक्षितरित्या आलेल्या या महामारीने अनेक कुटुंब उध्वस्त केलेली आहेत. या महामारीचा प्रभाव कमी झाला असला तरी अजूनही पूर्णपणे तो गेला नाही. तरीही गेल्या काही काळात चांगला दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, बार्शी व मोहोळ या तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. विशेष बाब म्हणजे पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक ६७४ मृत्यू झाले आणि याच तालुक्यात जवळपास ३७ हजार रुग्ण आढळले. आता पंढरपूर शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी दोन रुग्ण सक्रिय आहेत. तर मोहोळ शहरात एक रुग्ण आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील काही महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. प्रतिबंधित लसीकरणामुळे हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. १२ वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधित लस टोचण्यात आली. शहरात पाच महिला व एक पुरुष तर ग्रामीणमधील चार महिला आणि एका पुरुषाला कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातील काहीजण आता बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाहीत.
शहरातील एक हजार १५१ तर ग्रामीणमधील तीन हजार ७३० जणांचा बळी घेणारा कोरोना आता बोथट झाला आहे. मृत्यूदेखील थांबले आहेत. बहुतेक लोकांचे लसीकरण झाले आहे. सध्या आढळलेल्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळत नाहीत. तरीही, नागरिकांनी स्वत:बरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी. घरातील कोणी आजारी पडल्यास (खोकला, सर्दी, ताप) तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा